संस्कृत विश्वविद्यालयात जगद्गुरू श्रीशंकराचार्य एकदिवसीय विचारगोष्ठीचे उद्घाटन
अद्वैत तत्त्वज्ञान सुगम व एकात्मतेचे दर्शन घडविते – प्रो मधुसूदन पेन्ना
श्रीशंकराचार्याच्या अखंड भारतयात्रेने एकात्मता निर्माण केली – प्रो प्रसाद गोखले
महाराष्ट्रातील संतपरंपरेवर श्रीशंकराचार्याच्या विचार व तत्त्वज्ञानाचा प्रभाव प्रो – पराग जोशी
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा भारतीय दर्शन विभाग आणि भारतीय भाषा समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू श्रीशंकराचार्य एकदिवसीय विचारगोष्ठीचे आयोजन बुधवार, दि. 27 मार्च 2024 रोजी रामटेक येथे करण्यात आले होते. या विचारगोष्ठीची चार सत्रे होणार असून दोन सत्रे रामटेक, प्रत्येकी एक नागपूर व रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहेत. या विचारगोष्ठीचे उद्घाटन तसेच पहिले सत्र आज रामटेक येथील मुख्यालयात संपन्न झाले.
कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या प्रेरणेने आयोजित या सत्राचे अध्यक्षपद पूर्व कुलगुरू प्रो मधुसूदन पेन्ना, अधिष्ठाता, भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकाय यांनी भूषविले. विशेष उपस्थिती कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय यांची होती. प्रमुख वक्ते या नात्याने प्रो पराग जोशी, विभाग प्रमुख, आधुनिक भाषा विभाग, प्रो प्रसाद गोखले, संचालक, विद्यापीठ नियोजन विकास मंडळ, डॉ अमित भार्गव आणि प्रा सचिन द्विवेदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. समन्वयक डॉ सचिन डावरे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात डॉ पेन्ना यांनी आदि श्रीशंकराचार्य यांनी या विचारगोष्ठीचे स्वरूप विशद केले. श्रीशंकराचार्यानी सनातन धर्माचे पुनरुज्जीवन आणि भारतयात्रेद्वारे एकात्मता रुजविण्याचे महकार्य केले आहे. त्यांचे जीवन, योगदान आणि विचारपरंपरा यांचे नव्या पिढीला आकलन व्हावे यासाठी या विशेष विचारगोष्ठींचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक, दर्शनशास्त्राचे गाढे
विद्वान् आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो मधुसूदन पेन्ना यांनी श्रीशंकराचार्याच्या अद्वैतवेदान्ताचे सार सोप्या शब्दात उलगडून सांगितले. जीव, जगत् आणि ब्रह्म यांचा आंतरसंबंध कसा आणि तो आपण कसा बघितला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे यावर विस्ताराने भाष्य केले. ब्रह्म सत्य आहे कारण ते त्रिकालाबाधित आहे अर्थात काळाचा त्यावर परिणाम होत नाही. जगत् हे सही नाही आणि असही नाही तर ते मिथ्या आहे; कारण ते दररोज बदलत असते; परंतु अनुभवाला येत असते. जीव हा चैतन्याचा ब्रह्माचा अंश आहे; अज्ञानामुळे आपण स्वतःला मर्यादित मानतो आणि जगातच रमतो, मी ला सत्य मानतो, जीवाला हा भ्रम होतो याचे कारण अविद्या होय ती दूर करून अमर्यादित ब्रह्मच जीव आहे याचे ज्ञान होणे हेच खरे ज्ञान होय. हे ज्ञान स्थिर होण्यातील अडथळे दूर करून ब्रह्म जाणून घेण्याची उपासना हीच खरी तत्त्व साधना होय. विविध दार्शनिकांनी जटिल केलेल्या तत्त्वज्ञानाला केवल अद्वैत वेदान्ताच्या ज्ञानविवरणाने श्रीशंकराचार्यानी सर्वसामान्यांनाही समजेल असे सुगम केले. अद्वैत वेदान्ताद्वारे त्यांनी भारतीय दर्शनशास्त्राद्वारे एकात्मिक भारताचे दर्शन घडविले आहे; हेच अधोरेखांकित करण्यासाठी श्रीशंकराचार्याच्या जीवन व तत्त्वज्ञानावर आधारित या विचारगोष्ठींचे आयोजन केले आहे.
प्रमुख वक्ते प्रो प्रसाद गोखले यांनी ससंदर्भ केलेल्या भाषणातून श्रीशंकराचार्यानी त्यांच्या भाष्य, स्तोत्र, प्रस्थानत्रयीद्वारे आपली जीवनशैली, आचार-विचार, तत्त्वप्रणाली यासाठी मार्गदर्शन केल्याचे सांगितले. अखंड भारत यात्रेद्वारे त्यांनी एकात्मतेच्या सूत्रात भारतातील विविध पंथ, जाति, संस्कृती यांना एका सूत्रात गोवले आहे. तात्त्वीक, तार्किक, तपस्यारत, तेजस्वी, तीक्ष्ण आणि तरुण असे दर्शन आपल्याला श्रीशंकराचार्याच्या अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यात घडते. त्यांच्या स्तोत्र वाङ्मयाने समाजात भक्तिभाव निर्माण केला, भाष्य-टीकाग्रंथांनी ज्ञान दिले, अद्वैत वेदान्ताने विविध दर्शनातील जटिलता सुगम केली आणि अखंड भारतयात्रेने एकात्मता निर्माण केली हे त्यांचे कार्य खरोखर अद्भुत आहे.
प्रो पराग जोशी यांनी आपल्या प्रभावी, मुद्देसूद भाषणातून श्रीशंकराचार्याच्या सैद्धान्तिक व व्यावहारिक योगदानाचा आढावा घेतला. प्रो जोशी म्हणाले, श्रीशंकराचार्यानी समग्र भारतवर्षाची यात्रा करून राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित केली. भारतातील सनातन संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेवून, रीती, नीती, प्रवृत्ती समजून घेतल्या. चार दिशांना मठ स्थापन केले. कुंभमेळा, द्वादश ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. या तीर्थयात्रेतून प्राप्त या सर्वाचा विचार भेदभावरहित अद्वैतमताची प्रस्थापना करताना त्यांनी केला म्हणूनच त्यांना समन्वयाचार्य म्हटले जाते. महाराष्ट्रातील संतपरंपरेवर श्रीशंकराचार्याच्या विचार व तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला आहे. आजच्या तुकाराम बीजेच्या दिवशी संत तुकाराममहाराजांचा विष्णुमय जग । वैष्णवांचा धर्म या अभंगाद्वारे प्रो. जोशी यांनी श्री शंकराचार्य तत्त्वज्ञान उलगडून दाखविले.
भारतीय भाषा समितीने श्रीशंकराचार्याच्या या योगदानावर अशा विचारगोष्ठींसाठी प्रोत्साहन दिले ही आनंदाची बाब असल्याचे प्रशंसोद्गार कुलसचिव प्रो पाण्डेय यांनी सांगितले. ते म्हणाले, श्री शंकराचार्याच्या विचारातून व्यावहारिक व्यवस्थापनाची सूत्रे तसेच गृहस्थाश्रमाची सूत्रे दिसून येतात; म्हणूनच आजही ते प्रासंगिक आहे.
कार्यकमाचे संचालन कृतिका जैन यांनी केले तर आभार सहसमन्वयक डॉ सचिन डावरे यांनी मानले.