यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बीव्हीजी समुहाअंतर्गत काम करणारा सफाई कर्मचारी शंकर बाळकांत बेंडकुळे त्याच्या नेहमीच्या वेळेनुसार मुक्त विद्यापीठाच्या गोदावरी अभ्यागत निवासस्थानातील खोलीमध्ये सफाई करत असतांना, तेथे एका अभ्यागताची सोन्याची अंगठी पडलेली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सदर खोलीत कोणीही उपस्थीत नसल्याने त्याने तातडीने सफाई पर्यवेक्षकांच्या मदतीने ती सोन्याची अंगठी विद्यापीठाच्या सेवा सुविधा कक्षाकडे सुपूर्त केली.
सदर घटना कुलगरू प्रा संजीव सोनवणे यांना कळविल्यानंतर कुलगुरूंनी शंकर बेंडकुळे याच्या प्रामाणिकपणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुक केले. तसेच आई वडीलांच्या चांगल्या संस्कारामुळेच तू हे चांगले काम करू शकला असेही त्यांनी नमूद केले. शंकर बेंडकुळे याच्या प्रामाणिकपणाबद्दल विद्यापीठाच्या परिसरात त्याचे कौतुक होत आहे.
याप्रसंगी सुनिल निकम, विजय अहिरराव, राजेंद्र हिरे, तुकाराम पाटील, निवृत्ती अहिरे, सफाई कर्मचारी पर्यवेक्षक अजय पूरकर, नामदेव दिवे उपस्थित होते.