‘स्वारातीम’ विद्यापीठात लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यान संपन्न
निसर्ग आणि माणूस हाच आदिवासी साहित्याचा केंद्रबिंदू आहे – डॉ संजय लोहकर यांचे प्रतिपादन
नांदेड : आदिवासी साहित्य हा सामूहिक जीवनाला अधिक प्राधान्य देतो. आदिवासींच्या धारणा, प्रेरणा, जाणिवा आणि मिथके ह्या इतर समाजापेक्षा वेगळ्या आहेत. जंगल, निसर्ग आणि सृष्टी नष्ट करणाऱ्यांचा विरोध करणारे आदिवासी हेच खरे निसर्गपूजक आहेत. धर्मपूर्व संस्कृती ही आदिवासींची अतिशय महत्त्वाची जीवनचरणी आहे. धर्म, वर्ग आणि वर्णविरहित संहिता हेच खरे आदिवासी साहित्य होय. असे आदिवासी साहित्याच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाचे विधान त्यांनी केले. त्या अर्थाने निसर्ग आणि माणूस हाच आदिवासी साहित्याचा केंद्रबिंदू आहे. असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आदिवासी साहित्य व चळवळीचे अभ्यासक डॉ. संजय लोहकरे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल मराठी विभागाच्या वतीने लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ रमेश ढगे होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ संजय लोहकरे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मराठी विभाग प्रमुख डॉ पृथ्वीराज तौर, संयोजक डॉ वैजनाथ अनमुलवाड, डॉ दिलीप चव्हाण, डॉ पी विठ्ठल हे विचारापिठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ लोहकरे म्हणाले की, समानता हे आदिवासी समाजाचे प्रधान वैशिष्ट्य आहे. निसर्ग विषयीच्या जाणिवा, पशुपक्षी, प्राणी याविषयी असलेली भूतदयावधी दृष्टिकोन आणि सर्वांप्रती प्रेम, आपुलकी इत्यादी मूल्य आदिवासींनी जिवापाड जपली आहेत. मानवतावाद, विज्ञानवाद, राष्ट्रवाद आणि समाजनिष्ठा याविषयी त्यांना प्रचंड आदर आहे. कवी, लेखक, विचारवंत आणि चित्रपट निर्मात्यांनी आदिवासींचे जीवन समजून घेऊन सकारात्मक लेखन करावे. जेणेकरून आदिवासींचा खरा इतिहास आणि चेहरा जगासमोर येईल. त्याकरिता आदिवासी या व्यापक संकल्पनेची सह अनुभुतीपूर्वक मांडणी करण्याची आवश्यकता आहे. असे डॉ लोहकरे यांनी संशोधक विद्यार्थ्यांपुढे आशावाद व्यक्त केला.
डॉ ज्ञानेश्वर वाल्हेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आदिवासी साहित्याची तटस्थपणे समीक्षा होणे गरजेचे आहे. आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता आणि विद्रोह तसेच श्रम, समूह आणि सहकार या मानवतावादी तत्त्वामुळे आदिवासींचे निश्चितपणे वेगळेपण जाणवते. सामूहिक विश्वस्त हीच खरी आदिवासींची जाणीव आहे. आणि समानता आदिवासी साहित्यातून चित्रित होताना दिसते आहे. डॉ वाल्हेकर यांनी आदिवासी साहित्याबद्दलाचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला या व्याख्यान सत्राच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व आदिवासी साहित्य, संस्कृती आणि बोलीभाषांचे अभ्यासक डॉ वैजनाथ अनमुलवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ पृथ्वीराज तौर यांनी भाषा संकुलाची भूमिका मांडून पाहुण्यांचा विस्तृत परिचय करून दिला. डॉ रमेश ढगे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी शिक्षणशास्त्र संकुलाचे डॉ केंगले यांच्यासह भाषा संकुलातील व विद्यापीठ परिसरातील अनेक विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ अनमुलवाड यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आठवले, शोभा सरकुंडे, राघव भवरे, रेणुका व्यवहारे, संध्या बेंद्रे, अपर्णा काचकोंडे, सागर डोंगरदिवे व संकुलातील संशोधक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.