उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जागतिक वन दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न
जळगाव : अन्न व आरोग्य ही दोन प्रमुख आव्हाने सद्यस्थितीत जगासमोर आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी पर्यावरण टिकविणे व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व महाराष्ट्र शासन, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. २१ मार्च रोजी जागतिक वन दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जळगाव येथील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी संजय पाटील व विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा आशुतोष पाटील उपस्थित होते.
कुलगुरू प्रा माहेश्वरी पुढे म्हणाले की, विकास व पर्यावरण हे एकमेकांना पुरक असावेत. मोठ्या प्रमाणावरील प्रदुषणामुळे आरोग्यमान खालावत चालले असून ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस, हीम वर्षाव, तापमानात वाढ या गोष्टी दिसून येत आहेत. पर्यावरण संर्वधनासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असून केवळ झाडे लावून नाही तर ती जगविली देखील गेली पाहिजेत. विद्यापीठाच्या माळरानावर ३० वर्षापूर्वी तुरळक झाडे होती. विद्यापीठात सामुहिक प्रयत्नांमुळे आजमितीस अडीच ते तीन लाख इतकी झाडे लावण्यात आली व ती जगविण्यात आली असून पर्यावरणाचे संवर्धन करण्याबाबत विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाचे ब्रीद वाक्य “टीच वन, इच वन ट्री वन” असे करुन पर्यावरण जागृतीचे प्रयत्न सुरु केले आहेत. संलग्नीत महाविद्यालयांना देखील झाडे लावणे व झाडे जगविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागीय वन अधिकारी संजय पाटील यांनी सांगीतले की, पर्यावरणाची अधोगती होण्यास मानव जबाबदार आहे. पृथ्वीवर तेहतीस टक्के वन जमीन आवश्यक असून आजमितीस केवळ २० ते २१ टक्केच वनजमीन आहे. ती वाढविण्यावर भर देणे गरजेचे असून त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाद्वारे प्रयत्न केले जात आहे. प्रास्ताविक करतांना प्रा. आशुतोष पाटील यांनी सांगितले की, भारतात प्रदुषण मुक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आवश्यक असून निसर्ग, वन, जंगल, पशु यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असावा. कार्यक्रमाची सुरूवात वृक्ष पूजनाने करण्यात आली. सुत्र संचालन सुभाष पवार यांनी केले. तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रणाली धरमाळे यांनी मानले.
उद्घाटनानंतरच्या सत्रात जळगाव येथील मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांनी मानव व वन्यजीव संघर्ष या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या भाषणात मानव प्राणी व जंगलातील जीव सृष्टी यांच्या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर वन व वन्यजीव अभ्यासक उमेश सोनार यांनी बांबू लागवड संदर्भात माहिती देऊन त्याच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. वन्यजीव अभ्यासक राहूल सोनवणे यांनी सातपुड्यातील जैव विविधता या संदर्भात माहिती देऊन विवेचन केले.
समारोप सत्र कुलसचिव डॉ विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी डॉ विनोद पाटील यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जागतिक वन दिन सारखे कार्यक्रम होणे आवश्यक असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागातील जिल्ह्यामधील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील उद्यान विभागातील कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.