देवगिरी महाविद्यालयात विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व आवाजाची कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पुरस्कार वितरण सोहळा आणि आवाजाची कार्यशाळा दिनांक 20 मार्च 2024 रोजी संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य अशोक तेजनकर, उद्घाटक वैशाली हंगरगेकर, मुख्य न्यायदंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर न्यायालय, सोनाली लोहार, व्हाईस थेरपीस्ट ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, प्रमुख उपस्थिती यशवंत शितोळे, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र,व प्राचार्य डॉ भारत खंदारे विभागीय प्राचार्य प्रवर्तक करियर कट्टा हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत शितोळे यांनी केले त्यांनी करिअर कट्टा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय गुण विकसित व्हावे त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात तो यशस्वी व्हावा यासाठी त्याला सर्वतोपरी तयार करण्याचे काम केले जाते. करिअर कट्टा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयएएस आपल्या भेटीला यामध्ये अधिकारी व तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. तसेच यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, सायबर सिक्युरिटी इ. 52 अॅडॉन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक व व्यवसाय क्षेत्रात करिअर करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमांमध्ये उद्योजक व बँक अधिकारी मार्गदर्शन करतात. तर उद्योजकीय कौशल्य व गुण त्यांच्यात विकसित होण्यासाठी त्यांना यशस्वी व प्रसिद्ध उद्योजक मार्गदर्शन करतात. नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी निर्माण करणारे हात लोकांच्या समोर यावेत या उद्देशाने प्रत्येक महाविद्यालयांमध्ये इंक्युबॅशन सेंटर सुरू करून उद्योजक तयार करणे हा यामागचा हेतू आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार करिअर कट्टा उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना स्किल प्रशिक्षण, सर्व कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यामध्ये 100 मॉडेल स्किल सेंटर व 100 सेंटर ऑफ एक्सलन्स यामध्ये अद्यावत अभ्यासिका व इनक्युबॅशन सेंटर हे महाविद्यालयाला देण्यात येणार आहेत त्याचे सामंजस्य करार पूर्ण झाले आहेत. प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी “आर्थिक कार्यशाळा” व “आवाजाची कार्यशाळा” असे अनेक उपक्रम चालू करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत ऑन जॉब ट्रेनिंग व इंटर्नशिप याबद्दल माहिती दिली यानंतर करिअर कट्टा अंतर्गत विभागीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यात देवगिरी महाविद्यालयाला उत्कृष्ट जिल्हास्तरीय करियर कट्टा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विविध गटा मधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यात करिअर कट्टा अंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या विभागातील विविध स्तरावरील 57 पारितोषकांचे वितरण करण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्यानंतर सोनाली लोहार व्हाईस थेरपीस्ट ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच लॅंग्वेज पॅथॉलॉजिस्ट यांची आवाजाची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचा लाभ मराठवाड्यातील 26 प्राचार्य व 143 प्राध्यापकांनी घेतला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सोनाली लोहार यांनी प्राध्यापकांनी आपल्या आवाजाची काळजी कशी घ्यावी याविषयी सांगत स्वरयंत्र त्याची रचना व बोलण्याच्या विविध सवयींचे त्यावर होणारे परिणाम त्यामुळे होणारे घशाचे विकार याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच आपल्या आवाजाची काळजी घेण्यासाठी ‘कंठ शुचिता’ आवाज टिकविण्यासाठी तसेच सर्व प्राध्यापकांचा आवाज विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचविण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. दुसऱ्या सत्रात आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना सहज करता येतील असे मानेचे व घशाचे व्यायाम व त्याचा स्वरयंत्रावर होणारा चांगला परिणाम याविषयी सविस्तर माहिती देत त्याची प्रात्यक्षिके प्राध्यापकांकडून करून घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उपस्थित काही प्राध्यापकांनी कार्यशाळेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व कार्यशाळा यशस्वी पार पडली याबद्दल समाधान व्यक्त केले. प्राचार्य अशोक तेजनकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये करिअर कट्टा अंतर्गत राबविले जाणारे उपक्रम हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये किती उपयुक्त आहेत आणि त्याचा कौशल्य विकास, ऑन जॉब ट्रेनिंग व इंटर्नशिप साठी कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल माहिती दिली व आपल्या भाषणामध्ये करिअर कट्टाचे पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेले शैक्षणिक उपक्रम करिअरकट्टा अंतर्गत दोन वर्षापासून राबवायला सुरुवात केली आहे. सर्व प्राचार्य आणि समन्वयकांनी करिअर कट्टा उपक्रम व्यवस्थित समजून घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला पाहिजे व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला पाहिजे जेणेकरून या स्पर्धेच्या युगात आजचा तरुण यशस्वी होईल.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी देवगिरी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्हा समन्वयक व सर्व तालुका समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक यांनी आवाजाची कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय डॉ राजेश लहाने विभागीय समन्वयक करिअर कट्टा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ वैशाली पेरके यांनी केले