डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा (उन्हाळी-२०२४) २ एप्रिल पासून

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत मार्च/एप्रिल, २०२४ च्या (उन्हाळी-२०२४) परीक्षांचे आयोजन २ एप्रिल २०२४ पासून करण्यात आले आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण ३५ परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून पॅटर्न २०१८ आणि चॉईस बेस ग्रेडींग सिस्टीम अंतर्गत अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा समावेश आहे. उन्हाळी-२०२४ परीक्षेसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३,५५,८६९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

सदरील परीक्षा सुरळीत पार पाडल्या जाव्यात यासाठी विद्यापीठामार्फत एकूण २७५ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आहे. तसेच परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात तसेच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये साठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सहकेंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्या परीक्षा केंद्रावर सहकेंद्र प्रमुख रुजू होण्यास अडचणी असतील अशा परीक्षा केंद्रावर त्याच महाविद्यालयातील ०१ शिक्षकांना सहकेंद्र प्रमुख नियुक्त करण्यासंबंधी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याकरिता जिल्हानिहाय एकूण ३७ भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच त्यामुळे कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास, अशा परीक्षा केंद्रावर तातडीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे परीक्षा केंद्रांनी आपल्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

Advertisement

उन्हाळी-२०२४ परीक्षांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टिने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ०८ मूल्यांकन केंद्र निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट परीक्षा केंद्र प्रमुख वगळता कोणालाही वापरता येणार नाही, अशा कडक सूचना सर्व प्राचार्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थीनीही परीक्षा केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट इत्यादी सोबत बाळगु नये. तसे आढळल्यास परीक्षेसंबंधीच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

तसेच उपस्थिती/अनुपस्थिती बाबतचा अहवाल तसेच गैरप्रकाराचा अवलंब केल्याप्रकरणीचा अहवाल पेपर सुरु असतांनाच ऑनलाईन पध्दतीने यापूर्वी कळविण्यात आलेल्या पोर्टलवर सादर करावा. सदरील अहवाल पेपरच्या कालावधीतच प्राप्त न झाल्यास अशा परीक्षा केंद्रावरही तातडीने कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील ४८ (४) अन्वये परीक्षेच्या कार्यात सर्वांनी सहभाग नोंदवून परीक्षेचे कार्य करणे अनिवार्य असल्याने सर्वांनी परीक्षेच्या कार्यात सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page