संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आदर्श विद्यार्थी व उत्कृष्ट कलावंत पुरस्कार प्रदान
विद्यापीठातून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडावा – कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते
वैष्णवी आसेकर व कैवल्य रुद्रे ठरले आदर्श विद्यार्थी
अमरावती : उद्याचे विद्यार्थीरुपी आदर्श नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षक, पालक, महाविद्यालय व विद्यापीठाची असून विद्यापीठातून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडावा असे प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आदर्श विद्यार्थी व उत्कृष्ट कलावंत पुरस्कार प्रदान कार्यक्रम कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर, रा.से.यो. संचालक डॉ निलेश कडू, मोटीवेशन स्पीकर तानकर उपस्थित होते.
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची वैष्णवी रंगराव आसेकर आणि शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावतीचा कैवल्य रुद्रे यांचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन कुलगुरू डॉ बारहाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेत पदके प्राप्त केलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ, इंद्रधनुष्य युवा महोत्सव, मध्य/पश्चिम विभाग, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव, राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय, विविध युवा महोत्सव संघात उत्कृष्ट कामगिरी करुन पदके प्राप्त केलेल्या उत्कृष्ट कलावंत मुले व मुलींचा तसेच युवा महोत्सव, राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला विद्यार्थी संसद चमू यामध्ये व्यवस्थापक म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या प्राध्यापकांचा कुलगुरूंच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
कुलगुरू पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबत सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी विद्यापीठाकडून विविध स्पर्धांचे आयोजन केल्या जाते. यशस्वी विद्यार्थी कलावंतांचा सत्कारही केल्या जातो. आजच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना जगाशी सामना करायचा आहे. त्यासाठी संस्कार, टीकवण हीच कामी येणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे, भरपूर वाचन, क्रीडांगणावर सराव या बाबीला प्राधान्य द्यावे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर विवेक बुध्दीने करावा असे सांगून त्यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनो पाया मजबूत करा – कैलास तानकर
विद्यार्थ्यांनो भविष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर आपला पाया मजबूत असणे आवश्यक आहे. मी स्वत: एक विशेष आहे, जीवनात जे व्हाल, ते टिकवून ठेवा, सामान्य ज्ञान सातत्याने वाढवा, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवा, वक्तृत्व उत्कृष्ट ठेवा आणि आपली प्रकृती उत्तम ठेवा यांसह अनेक व्यक्तिमत्वाच्या टिप्स कैलास तानकर यांनी याप्रसंगी दिल्यात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासावर ते बोलत होते. याप्रसंगी मनोरंजनपर विविध गीते त्यांनी त्यांच्या चमूतील कलावंतांनी सादर केलीत. यावेळी सभागृहातील प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
विद्यापीठ गीताने सुरू झालेल्या कार्यक्रमात संत गाडगे बाबा प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर कैलास तानकर यांचा स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन कुलगुरूंनी सत्कार केला. प्रास्ताविकेतून डॉ राजीव बोरकर यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका मांडली. संचालन सोनल कामे यांनी तर आभार डॉ बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला पाचही जिल्ह्रातील कलावंत, गुणवंत विद्यार्थी, रा.से.यो. चे स्वयंसेवक, शिक्षक, गणमान्य नागरिक उपस्थित होते.