‘स्वारातीम’ विद्यापीठाला इंद्रधनुष्य मध्ये लोकआदिवासी नृत्यातील चॅम्पियनशिप
नांदेड : इंद्रधनुष्य हा आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय युवक महोत्सव नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे दि ११ ते १५ मार्च या कालावधीमध्ये संपन्न झाला. या महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नृत्य प्रकारात आदिवासी नृत्यात सुवर्णपदकासह चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे. या महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ सहभागी झाला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात इंद्रधनुष्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात एकूण २४ कला प्रकारामध्ये विद्यापीठाने सहभाग नोंदवला होता. या महोत्सवात स्वा.रा.ती.म. विद्यापीठाला नृत्य प्रकारात आदिवासी नृत्यात सुवर्णपदकासह तीन पारितोषिके प्राप्त झाले. त्यामध्ये लोकनृत्य/आदिवासी नृत्य- सुवर्णपदक, शास्त्रीय सुरवाद्य –तृतीय आणि वक्तृत्व-तृतीय असे पारितोषिके प्राप्त झाले.
विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमतः लोक आदिवासी नृत्य यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ‘आदिवासी दंडार’ नृत्यास सुवर्णपदकासह नृत्य विभागाची अत्यंत महत्त्वाची व मानाची चॅम्पियनशिप मिळाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नृत्य प्रकारातील उत्कृष्ट संघ म्हणून गौरविण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
पश्चिम विभागीय युवा महोत्सवात चमकदार कामगिरी करून लोकवाद्य वृंद (फोक आर्केस्ट्रा) या कला प्रकारात नैपुण्य मिळवत विद्यापीठाने राष्ट्रीय युवा महोत्सवात आपले स्थान पक्के केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वाटचालीत इंद्रधनुष्य महोत्सवात नृत्य प्रकारात मिळालेल्या चॅम्पियनशिपमुळे आदिवासी नृत्यातील लखन कनाके, शंभू आत्राम, प्रज्योत कांबळे, तोफिक शेख, पवन येरमे, प्रदीप तोडसाम, आकाश मडावी, सौरभ नैताम, अक्षय जाधव, रोशन वेट्टी, वक्तृत्व स्पर्धेत कृनाल बेद्रे आणि शास्त्रीय सुरवाद्य सारंग भोळे या विद्यार्थी कलावंतांनी अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.
या यशाबद्दल कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, हनमंत कंधारकर, डॉ. वाणी लातूरकर, प्राचार्य डॉ. मा.मा. जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
संघ व्यवस्थापक व वांग्मय विभागाचे प्रशिक्षक म्हणून डॉ. संदीप काळे व प्रा. माधुरी पाटील यांनी व्यवस्थापिका म्हणून भूमिका बजावली. नृत्य विभागाचे प्रशिक्षक संदेश हटकर यांनी आदिवासी ‘दंडार’ या नृत्याचे दिग्दर्शन केले तर संगीत विभागासाठी डॉ. शिवराज शिंदे, नाट्य विभागासाठी दिलीप डोंबे व संजय जांभळदरे, लोक वाद्यवृंद साठी डॉ. पांडुरंग पांचाळ यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. तर कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे, जीवन बारसे यांनी संघासाठी परिश्रम घेतले.