‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ “उत्कर्ष-२०२४” स्पर्धेसाठी जळगाव येथे रवाना
नांदेड : महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उत्कर्ष-२०२४ सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे’ आयोजन दि. १७ ते २० मार्च या कालावधीत जळगाव विद्यापीठामध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ जळगाव येथे रवाना झाला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यातील महाविद्यालयातून ९ स्वयंसेवक व ९ स्वयंसेविका यांची निवड करून विद्यापीठाचा संघ तयार करण्यात आला. संघप्रमुख म्हणून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ संभाजी मनूरकर यांची निवड करण्यात आली.
या शिबिरामध्ये लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयातील अर्जुन पवार, निकिता कापसे, गायत्री बेडजवळगे, वैष्णवी कासले, धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील नागेश वाघमारे, पूजिता पंदेनवाढ, शालिनी वाघमारे, निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयातील गीता वाडकर, दिपक धुमाळ, लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील वैभव मस्के व शिवाली मुकडे, वैष्णवी कांबळे, नांदेड येथील सायन्स कॉलेजचे प्रफुल इंगोले, नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयातील संभाजी तोटरे, हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील अतुल खोकले, शिवाजी महाविद्यालय परभणी येथील प्रकाश ढाले, आझाद महाविद्यालय औसा येथील गायत्री कदम, श्री कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथील अजय कांबळे या स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा समावेश आहे.
याप्रसंगी संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दिगंबर नेटके, प्र. वित्त व लेखा अधिकारी मोहम्मद शकील, व्यवस्थापन परिषद सदस्य हनमंत कंधारकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्र संचालक डॉ मनोज रेड्डी, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम व विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.