उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “उत्कर्ष” या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
जळगाव : पारंपारिक लोककला जीवंत ठेवण्यासाठी पोवाडा, भारुड, भजन या भारतीय लोककलेचे समृध्द सादरीकरण तसेच लोकवाद्यांमध्ये ढोलकी, हलगी, संबळ, पखवाज, यांचा नादमय वापर करत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडवीले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष” या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचा सोमवारी दुसरा दिवस होता. सकाळी नऊ वाजता पोवडा, भारूड आणि भजन या भारतीय लोककला स्पर्धेला प्रारंभ झाला.
राज्यातील पंधरा विद्यापीठांच्या संघांनी यात भाग घेतला आहे. वीरांच्या प्रराक्रमांची आणि विद्वानांच्या बुध्दीमत्तेचे सामर्थ्य सांगतांना या पोवाड्यांना आताचे सामाजिक संदर्भ जोडून स्फूर्ती आणली गेली. भारुडातून नितीमुल्ये आणि आताचे सदंर्भ यावर समर्पक शब्दात मत व्यक्त केले. भजनाद्वारे भक्तीपुर्ण वातावरण निर्मिती केली.
त्यानंतरच्या सत्रात भारतीय लोकवाद्य स्पर्धा झाली. ढोलकी, बासरी, हलगी, खंजीरी, नाल, डफ, मृदंग, पखवाज, संबळ, दिमडी, ढोल, तबला, धनगरी ढोल, हार्मोनिअम, तुणतुणे या वाद्यांचा समृध्द वापर करून नादमय आणि तालमय असे वातावरण दीक्षांत सभागृहात निर्माण केले. काही कलावंतांनी एकाचवेळी पाच ते सहा वाद्यांचा वापर प्रभावीपणे केला. बोटांचा हुकमी वापर आणि रियाज याचे दर्शन यातून घडत होते. ढोलकीचा बाज, लावणीची नाल, तुणतुणाचा गुंजारव, घुंगरांचा नाद आणि मृदंगाचा भक्तिभाव याचे एकत्रित सामायिक प्रदर्शन रसिकांना सुखावणारे होते. एकीकडे पाश्चात्य वाद्य शिकण्याकडे तरूणांचा ओढा असल्याचे म्हटले जात असतांना रासेयोच्या कलावंतांनी समृध्द अशी लोकसंस्कृती जपण्यासाठी ही पिढी तयार असल्याचा संदेश यावेळी दिला.
दुपारनंतरच्या सत्रात संकल्पना नृत्य स्पर्धा झाली. संकल्पनानृत्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या संकल्पनेवर आधारीत स्वच्छता, पर्यावरण, धाडस, जनजागृती, चंद्रयान, स्त्री सुरक्षा, सुदृढ भारत हे विषय अंत्यत ताकदीने हाताळतांना लावणी, भरतनाट्यम, कत्थक, या नृत्याचा आधार घेण्यात आला. यावेळी सिनेट सदस्य केदारनाथ कवडीवाले, सुरेखा पाटील, रा से यो संचालक डॉ सचिन नांद्रे उपस्थित होते. यावेळी दीक्षांत सभागृहात भित्ती पत्रके व कार्यप्रसिध्दी अहवाल प्रदर्शन मांडण्यात आले होते.
सायंकाळच्या सत्रात निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंधासाठी विकसीत भारत समृध्द भारत, राष्ट्रविकास : युवकांची जबाबदारी, आजच्या युवापिढीपुढील आव्हाने हे विषय देण्यात आले होते. उद्या काव्यवाचन, समुह गीत, भित्ती चित्र घोषवाक्य, वक्तृत्व सर्धा होणार आहेत.