स्त्रियांचा मानवतावादी दृष्टीने विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे – डॉ मंजुश्री पवार

छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला

कोल्हापूर : स्त्रियांचा मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययीन कालखंडातील एकमेवाद्वितिय राजे होते, असे गौरवोद्गार मराठा इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार यांनी आज येथे काढले. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेअंतर्त प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कै शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ भारती पाटील होत्या.

डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काळ हा स्त्रियांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करण्यासाठीचा आश्वासक काळ होता. मध्ययुगीन जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते, ज्यांनी स्त्रियांना समाजात आदराची व सन्मानाची वागणूक दिली. स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणारा कोणीही असो, त्याला अतिशय कडक शिक्षा केल्या. सद्यस्थितीत स्त्रियांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देवून भागणार नाही, तर त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Advertisement

अध्यक्षीय मनोगतात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन नेहमीच समतावादी होता. त्यांच्या समतावादी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब त्यांनी स्थापित केलेल्या प्रशासनिक राज्यव्यवस्थेमध्ये आढळून येते. औरंगजेबाच्या दरबारातील लेखक खाफीखान यानेही शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तत्कालीन राजेशाही व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांपूर्वी आणि त्यांच्या नंतरही अन्य कोणाही राजाने स्त्रियांच्या बाबतीत इतकी आदराची, सन्मानाची भूमिका घेतलेली दिसत नाही. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराज महान ठरतात. त्यांच्या विचाराचा जागर प्रत्येकाने करायला हवा.

यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. राजश्री जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले. व्याख्यानास मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, शिवचरित्रकार डॉ. इस्माईल पठाण यांच्यासह विविध महाविद्यालयांचे व अधिविभागाचे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page