उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न
जळगाव : विद्यापीठाकडून मिळालेल्या शिक्षणामुळे उत्तुंग यश मिळाले, जीवनात यशस्वी होता आले, संधी प्राप्त करून घेण्याचे कौशल्य मिळाले, संघर्षातून यश संपादन करण्याची प्रेरणा मिळाली, अडचणीतून मार्ग कसा काढावा हे शिकलो, बदल स्वीकारून नवीन करण्याची उर्जा मिळाली, स्वप्न साकार करता आले अशा भावना माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळांमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार दि.१६ मार्च रोजी विद्यापीठातील अधिसभागृहात आयोजीत करण्यात आला. त्यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी तथा नाशिक येथील आयकर विभागाचे अतिरीक्त आयुक्त विशाल मकवाना, उद्योजक डॉ. के.सी. पाटील, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भूषण चौधरी हे होते.
यावेळी विशाल मकवाना यांनी सांगितले की, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना भरभरून दिले आता माजी विद्यार्थी म्हणून विद्यापीठाला देण्याची वेळ आहे. माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील शिक्षण घेणाऱ्या व भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी शक्य तेवढी मदत करणे अपेक्षीत आहे. विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्याने राष्ट्रासाठी व समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली असेही ते म्हणाले. डॉ. के.सी. पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कायम संपर्कात राहून विद्यापीठास मदतीचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले माजी विद्यार्थी हा विद्यापीठाचा महत्वपूर्ण घटक आहे. माजी विद्यार्थ्यांची नाळ कायम विद्यापीठाशी जोडलेली ठेवावी. विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये कायम सहभाग राहू द्यावा असे सांगून विद्यापीठाच्या प्रगती विषयी संपूर्ण आढावा मांडला. तसेच विद्यापीठाने तयार केलेला अॅल्यूमिनी कनेक्ट ॲप चा उपयोग करून संपर्क ठेवावा असे आवाहन केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी अविनाश सोनवणे, धनंजय झोपे, डॉ. निलेश तेली, प्रमोद संचेती, डॉ. योगेश गजभारे, मनोज चांडक, चंद्रकांत साळुंखे, डॉ. दिनेश पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तर प्रभात त्रिपाठी आणि प्रफुल्ल काळे यांनी ऑनलाईन मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी विद्यार्थी जी.बी. पटेल, योगेश दशरथे, विशाल मकवाना, धनंजय झोपे, प्रा. अविनाश सोनवणे, डॉ. निलेश तेली, सौ. वर्षा बोरा, राम कोठारी, सौ. रेश्मा अवचारे, प्रभात त्रिपाठी, मनोज चांडक, प्रफुल्ल काळे, प्रमोद संचेती, पराग देशमुख, निलेश भदाणे, चंद्रकांत साळुंखे, विजय शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केसीआयआयएल तर्फे स्टार्टअपद्वारे सुरु असलेल्या विविध उद्योगांचा उत्पादनाचा स्टॉल लावण्यात आला. प्रास्ताविक व माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश प्रा. भूषण चौधरी यांनी प्रारंभी मांडला, सूत्र संचालन प्रा. विना महाजन तर आभार डॉ.एस.बी. अत्तरदे यांनी मानले. यामेळाव्यात जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात सर्व माजी विद्यार्थ्यांची एकत्रित सभा घेण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपआपल्या प्रशाळांना भेटी दिल्या. प्रशाळेत शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा संवाद कार्यक्रम झाला. त्यानंतर प्रशाळेतील विद्यार्थ्यांसमवेत माजी विद्यार्थ्यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.