इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवात मुंबई विद्यापीठाने राखली ‘चॅम्पियनशिप’
शिवाजी विद्यापीठ उपविजेता
शोभायात्रेसह तीस कलाप्रकारांचे पारितोषिक वितरण
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षापासून इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे विजेतेपद जिंकण्याची परंपरा मुंबई विद्यापीठाने अबाधित राखली. तर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाने अनपेक्षितपणे पुणे विद्यापीठाला मागे टाकून उपविजेतेपदी मुसंडी मारली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.१५) नाटयगृहात झाला. कुलपती रमेश बैस यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. तर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
तसेच प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, अॅड दत्तात्रय भांगे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राजभवन निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ प्रमोद पाब्रेकर, वित्तीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.गोविंद कतलाकुटे, सदस्य डॉ. राजाराम गुरव, डॉ.संदीप आडोळे, डॉ.वाणी लातूरकर, डॉ.दीपक नन्नवरे यांचीही मंचावर उपस्थिती होती. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक तर संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले . सोहळ्याचे बहरदार सूत्रसंचालन डॉ. प्रेषित रुद्रवार व डॉ. समाधान इंगळे यांनी केले. २० वा इंद्रधनुष्य महोत्सव ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे होणार आहे.
यावेळी झालेली मान्यवरांची भाषणे.
- कलेला करिअरकडे नेणारा सप्तरंगी महोत्सव महाराष्ट्रातील युवा कलावंताच्या कलेला करिअरकडे घेऊन जाणारा हा सप्तरंगी महोत्सव यजमान विद्यापीठाने अत्यंत उत्तमरितीने आयोजित केला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी, संघप्रमुखांनी व्यक्त केली. निवास, भोजन व सर्व रंगमंचाचे नियोजन उत्कृष्ट होते. कुलगुरु व संचालक यांच्यासह सर्वांनी अविरत परिश्रम घेतले, याबद्दल सर्वांनी आभार मानले. यावेळी युवा कलाकार प्रलय महाखेत्री गडचिलेली, मेहंदी खातून शेख नागपूर, संघप्रमुख डॉ.निलेश राजे मुंबई, डॉ.नम्रता चोपडेकर नाशिक, संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव नांदेड, निरीक्षक डॉ.वाणी लातूरकर व राजभवन निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.प्रमोद पाब्रेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
- यशाने हुरळू नका, अपयशाने खचू नका : मा.विजय फुलारी युवा महोत्सवात सहभागी होणे, मनमोकळेपणाने कला सादर करणे, ही खरी उत्तम कलावंताची सुरुवात असते. त्यामुळे यशाने हुरळून जाऊ नका तर अपयशाने खचून जाऊ नका, असे प्रतिपादन मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी कलावंताना केले. अत्यंत कमी वेळेत आपल्या सर्व बहदूर सहकारी यांनी अत्यंत उत्तमरितीने आयोजन केले. महोत्सवातील हे कलावंत अशा राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सन २००८, २०१६ व २०२४ असे तीनदा इंद्रधनुष्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याचा उल्लेखही कुलगुरुंनी केला.
कलेला सामाजिक कार्याची जोड द्या – सोनाली कुलकर्णी
समाजमाध्यमांसह परंपरागत माध्यामातील कलावंताना आज चांगले दिवस आले आहेत. आजुबाजुला असलेल्या माणसांकडून प्रेरणा घेऊन उत्तम कलावंत व्हा. तसेच कलेला सामाजिक कार्याची जोड द्या, असा मोलाचा सल्ला प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दिला. मराठवाडा ही पाहुण्यांना आपुलकीची वागणूक देतो, याचा प्रत्यय यजमान विद्यापीठाने दाखवून दिल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी आपल्या जडणघडणीतील अनेक प्रसंग सांगितले. आपल्या संपुर्ण चित्रपट कारकिर्दीत रमाबाई आंबेडकर व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या भुमिका आपणास माती आणि समाजाशी नाळ कायम ठेऊन गेल्याचेही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.
१. या संपूर्ण कार्यक्रमात कलावंताची शिस्त व उत्साह व कार्यक्रमाचे नेटके नियोजन याचा प्रत्यक्ष उपस्थितांना प्रत्यक्ष आला.
२. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तथापि मा.कुलगुरुंसह सर्व अधिकारी यजमानांनी कसलेही स्वागत न स्विकारता साधेपणा दाखवून दिला.
३. सर्वच विद्यापीठाच्या कुलगुरुंना व संघप्रमुखास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर पुर्णाकृती असलेले स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.
४. समारोप समारंभाचे विद्यापीठ संकेतस्थळ व समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
५. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत कलावंताना उपस्थितांनी शिटी, टाळ्या व वाद्य वाजवून दमदार साथ दिली.
६. सर्वच वक्ते, युवा कलावंतानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.
(सोबत फोटो)
कॅप्शन : १. कुलगुरु डॉ.विजय फुलारी व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक स्विकारतांना मुंबई विद्यापीठ संघ.
२. कुलगुरु डॉ.विजय पुâलारी व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उपविजेतेपद स्विकारतांना शिवाजी विद्यापीठ संघ.
३. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कलावंतांना मार्गदर्शन केले.
४. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी मार्गदर्शन केले.