एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यास राज्य शासनाचा ‘युवा शेतकरी’ पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागात एमए द्वितीय वर्षात शिकणाऱ्या यज्ञेश कातबने या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाचा सन २०२२ या वर्षीचा ‘युवा शेतकरी पुरस्कार’ जाहीर झाला असून याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यज्ञेश हा पैठण तालुक्यातील धनगाव येथील प्रगतशील शेतकरी असून त्याने आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. विशेषत: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत त्याने आपल्या शेतामध्ये फळबागांची लागवड केलेली आहे. या माध्यमातून त्याने विक्रमी उत्पादन घेत इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे. आज तो आपल्या शेतामध्ये आंबा, पेरू, मोसंबी आणि सिताफळाचे उत्पादन घेत आहे.
हा राज्य शासनाचा अत्यंत मानाचा असणारा ‘युवा शेतकरी’ पुरस्कार यज्ञेश कातबने यास मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ. जॉन चेल्लादुराई, संचालिका डॉ. झरताब अंसारी व प्रा. रामेश्वर कणसे यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.