एसएफआयचा शासकीय आयटीआयचे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बीड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) बीड जिल्हा कमिटीच्या वतीने आज दिनांक १२ मार्च २०२४ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बीड येथील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना घेऊन हा विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला. शासकीय आयटीआय, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार मागण्यांची घोषणाबाजी केली. मोर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी यांना एसएफआयचे शिष्टमंडळ भेटले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने शासकीय आयटीआयचे प्राचार्य यांना पत्र काढून या सगळ्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
बीड येथील शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. संस्था परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होत आहे. संस्थेत दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. पिण्याचे पाणी देखील त्यांना संस्था परिसरात मिळत नाही. यापूर्वी एसएफआयचे शिष्टमंडळ विद्यार्थी प्रश्नांना घेऊन महाविद्यालयातील प्राचार्यांना भेटले होते. त्यांच्याशी चर्चा सुद्धा झाली होती. परंतु प्राचार्यांनी चार दिवसात समस्या सोडविण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थी आपला रोष व्यक्त करत आज एसएफआयच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले. आज एसएफआय च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून पुढील मागण्या करण्यात आल्या. (१) आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ फिल्टरचे पिण्याचे पाणी मिळावे. (२) शौचालये दुरुस्त करून ती नियमित स्वच्छ ठेवावीत. (३) विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर कॅन्टीनची व्यवस्था करण्यात यावी. (४) मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडची मशीन बसवण्यात यावी. (५) विद्यार्थ्यांसाठी नियमित ग्रंथालय सुरू करावे. त्यातून विद्यार्थ्यांना पुस्तके व वृत्तपत्रे द्यावीत. (६) विद्यार्थ्यांच्या तासिका वेळेवर व्हाव्यात. प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. (७) नवीन बनवलेली इमारत विद्यार्थ्यांच्या तासिका घेण्यासाठी लवकरच खुली करावी. (८) प्रात्यक्षिकासाठी अद्ययावत मशिनरी उपलब्ध करून द्या. (९) विद्यार्थ्यांना प्रतिमहिना २ हजार रुपये स्टायफंड देण्यात यावा.
आंदोलनाचे नेतृत्व एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा सचिव विष्णू गवळी, तालुका अध्यक्ष शिवा चव्हाण, तालुका सचिव रमेश नाईकवाडे, शहर सचिव आकाश कचरे, जिल्हा कमिटी सदस्य आरती साठे, तालुका उपाध्यक्ष सुरज कदम, तालुका सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे स्वप्निल तेलप, आयटीआय युनिट अध्यक्ष सोमेश्वर शिंदे, सुहास जायभाये यांनी केले. तर संकल्प साठे, अनिल राठोड, दत्ता सुरवसे, रुद्राक्ष कदम, प्रथमेश पऱ्हाणे, ऋषिकेश डोळस विवेक महाडिक, कार्तिक गोबरे, प्रदीप ससाणे, महावीर उबाळे, अनिकेत वाघमारे, किरण साबळे, संकेत कदम आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.