एमजीएम विद्यापीठात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम
‘संविधानाच्या चौकटीतून पक्षांतर बंदी कायद्याचं बदलतं रूप’ या विषयावर ॲड सिद्धार्थ शिंदे यांच्या व्याख्यानाचे मंगळवारी आयोजन
छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त ॲड सिद्धार्थ शिंदे (ज्येष्ठ विधीज्ञ, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली) यांचे ‘संविधानाच्या चौकटीतून पक्षांतर बंदी कायद्याचं बदलतं रूप’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे मंगळवार, दि.१२ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एम जी एम कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. ॲड शिंदे यांचे शिक्षण आयएलएस लॉ कॉलेज पुणे आणि कायद्याचे उच्च शिक्षण राष्ट्रीय विद्यापीठ सिंगापूर येथून झाले आहे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांच्या सोबत विविध महत्वपूर्ण खटल्यांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
राज्यात व देशात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने आमदारांचे पक्षांतर अनुभवास आलेले आहे.सर्वोच्च न्यायालयात संदर्भात अनेक खटले सध्या सुरू आहे.या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षांतर बंदी कायद्यात नेमकं काय मांडण्यात आलेले आहे व सध्याची कायदेशीर प्रक्रिया या संदर्भात ऍड शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुशराव कदम (अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर,जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर) तर एम जी एम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमास अभ्यासू नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.