उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते अमरावती विद्यापीठातील अनुकंपातत्वावर नियुक्तीचे शासन आदेश प्रदान

विद्यापीठांनी कामाची गती वाढवावी – चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

अमरावती : शासनानेही आता आपल्या कामांची गती वाढविली आहे, जेणेकरुन सर्वसामान्यांच्या समस्या तातडीने निकाली निघेल, त्याचप्रमाणे विद्यापीठांनी सुध्दा आपला कामाची गती वाढवावी, परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने त्याची पदवी डिजिटल स्वाक्षरीसह देण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा जिल्ह्राचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील अनुकंपातत्वावर नियुक्तीचे शासन आदेश वितरण सोहळ्यात अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्तीचे शासनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रतापदादा अडसड, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. उमेश काकडे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे व जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, विद्यापीठांनी आता स्वनिधीवर सुध्दा कार्य केले पाहिजे, त्याला शासनाकडूनही मदतीचा हातभार लावल्या जाईल. परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची पदवी सुध्दा तातडीने दिल्या गेली पाहिजे, जेणेकरुन त्याला पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडेल असे सांगून ज्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. 10,20,30 आश्वासित प्रगती योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्याना सुध्दा तातडीने लागू केल्या जाईल. याशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयातील आवश्यक रिक्त जागा भरण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी जागा निश्चित करावी, शासनाकडून त्याला मान्यता दिली जाईल, असे आश्वासनही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी दिले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी याबाबत आपल्या भाषणातून पालकमंत्र्यांना विनंती केली होती व ती पालकमंत्र्यांनी ती त्वरीत मान्य केली.

Advertisement

यावेळी अनुकंपा तत्वावरील उमेदवार नेहा देवानंद रॉय. अनजर खान अयुब खान, अब्दुल तौसिफ अब्दुल तसलीम, ऋषिकेश विनोद कांडलकर, अभिषेक गणेश देशमुख, अदिती दत्ता वाबळे व अदिती दिपक मोहोड यांना कनिष्ठ लिपिक पदाचे शासनादेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासूनच अनेक यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. नुकताच विद्यापीठाला पी.एम. उषा योजनेंतर्गत 20 कोटी रुपये, इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी रुपयाचे अनुदान शासनाकडून प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठामध्ये आदिवासी विद्यार्थीनींकरीता वसतीगृहाचे बांधकाम सुरू असून अनेक इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे. विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्रांचे विद्यार्थी आहेत व त्यांच्या कामासाठी येतांना अनेक समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो, त्यामुळे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना मोठी सुविधा होईल व त्यासाठी शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी कुलगुरूंनी पालकमंत्र्यांकडे केली. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी विद्यापीठ अग्रेसर असल्याचे तसेच शासनाच्या निर्देशाचे विद्यापीठाकडूनही गांभिर्याने पालन केले जाईल, अशी ग्वाही याप्रसंगी कुलगुरूंनी दिली.

प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी मांडली. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना 10,20,30, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत, रिक्त कर्मचा-यांची पदे भरण्यासाठी मंजुरी देण्याबाबत व गडचिरोली येथे सहसंचालक कार्यालय स्वतंत्रपणे देण्याबाबत मागणी केली. विद्यापीठाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, ऑफिसर्स फोरमचे अध्यक्ष शशिकांत रोडे यांनी विद्यापीठ कर्मचारी संघाच्यावतीने चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीताने करण्यात आली. संचालन व आभार विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठ प्राधिकारिणी सदस्य, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page