महात्मा गांधी मिशनचा यंदाचा ‘सक्षमा’ पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना जाहीर
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन ही संस्था मागील चार दशकांपासून शिक्षण, सेवा आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेंतर्गत विविध क्षेत्रांशी संबंधित उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच धर्तीवर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी महात्मा गांधी मिशन, एमजीएम विद्यापीठ व एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा ‘सक्षमा’ सन्मानाने गौरव केला जातो. २०२४ या वर्षीचा ‘सक्षमा’ पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना जाहीर झाला असल्याची माहिती सक्षमा ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अपर्णा कक्कड व अध्यक्षा डॉ. प्राप्ती देशमुख यांनी दिली आहे.
हा पुरस्कार अनुराधाताई कदम, शशिकला बोराडे, जयश्री जाधव यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. ‘सक्षमा’ पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून आजवर महाराष्ट्रातील अनेक कर्तृत्ववान महिलांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यंदा पारोमिता गोस्वामी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
शनिवार, दिनांक ९ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आदि मान्यवर उपस्थित असणार आहेत. तरी या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सक्षमा ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.
पारोमिता गोस्वामी यांच्याविषयी माहिती :
पारोमिता गोस्वामी या समाजाची मानसिकता बदलणारी दुर्गा म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. चंद्रपुरातील दारूबंदी चळवळ म्हटलं की समोर येते ते एकच नाव म्हणजे ‘पारोमिता गोस्वामी’ होय. त्यांनी सामान्य महिलांना लढायला शिकवलं. शेतमजूर, कामगार महिलांचा आवाज त्यांनी थेट दिल्लीपर्यंत पोहोचवला. त्यांनी १९९५ साली टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून एमए केलं. चार वर्ष ठाणे जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेत काम केल्यानंतर त्यांनी थेट चंद्रपूर गाठलं. श्रमिक एल्गार या संघटनेच्या माध्यमातून आदिवासी, दलित आणि कामगार वर्गासाठी काम सुरु केलं. त्यांनी दारूबंदीसाठी महिलांनी पुढे येऊन अनेक आंदोलने केली; या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.