एमजीएममध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सायबर गुन्हेगारी जनजागृतीपर व्याख्यान संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ जी वाय पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय आणि एमजीएम सक्षमा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून (दि.५) दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन परदेशी यांचे सायबर गुन्हेगारी जनजागृतीपर व्याख्यान विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी, दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन परदेशी, निर्मला निंभोरे, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख, दामिनी पथकातील अमृता गोफाळे, सिंधू वाडेकर, प्रियंका भिवसणे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक कांचन परदेशी म्हणाल्या, किशोर वयातील मुलांमध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून महिला आणि पुरुष हेही या प्रकारच्या गुन्ह्यांचे शिकार होताना आज दिसत आहेत. लहान मुलांच्या हातात असणारा मोबाईल हा त्यांचा मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावत असला तरी या माध्यमातून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. आपल्या मुलांचे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
शहराच्या सुरक्षिततेसाठी असंख्य ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. आपल्या आजूबाजूला काही निंदनीय कृत्य घडत असेल तर तत्काळ दामिनी पथकाला संपर्क साधणे आवश्यक आहे. काहीही घडले तर आपण पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आपले नाव गोपनीय ठेवले जाते. पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षेसह त्यांच्या मदतीसाठी असल्याचे पोलीस दलातील निर्मला निंभोरे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिव्या जगदाळे यांनी तर आभार डॉ. सारिका शेळके यांनी मानले.