महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ग्रंथालयात इंग्रजी भाषेच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात इंग्रजी भाषेविषयीच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, आंतरविद्या शाखेच्या जलसिंचन विभाग प्रमुख तथा कुलगुरुंचे विशेष कार्याधीकारी डॉ. महानंद माने, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. एम. आर. पाटील व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार आपल्या भाषणात म्हणाले की आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनाही इंग्रजीमध्ये संवाद साधतांना अडचणी येतात. या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेमधील व्याकरण, शब्दोचार, स्पेलिंगमधील चुका यांच्यामध्ये सुधारणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय कोळसे या प्रयोगशाळेविषयी माहिती देतांना म्हणाले की या प्रयोगशाळेचे महत्व विद्यापीठाचे मानांकन सुधारण्यासाठी महत्वाचे आहे. ही प्रयोगशाळा सुरु करणे हा उपक्रम पदव्युत्तर महाविद्यालयाचा असून विद्यापीठ ग्रंथालयाच्या मदतीने तो राबविण्यात येत आहे. याप्रसंगी या इंग्रजी भाषेच्या प्रयोगशाळेला तांत्रिक सहकार्य देणाऱ्या कंपनीचे तांत्रिक सहाय्यक प्रशांत जाधव यांनी प्रयोगशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुनिल भणगे यांनी मानले. या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी डॉ. संजय कोळसे, डॉ. एम.आर. पाटील, डॉ. सुनिल फुलसावंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. अनिल काळे, डॉ. विलास वाणी, डॉ. विजू अमोलिक, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे व इतर प्राध्यापक तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.