शिवाजी विद्यापीठात ‘भारत-पाकिस्तान संबंध’ या विषयी विशेष व्याख्यानमालेचे उद्धघाटन संपन्न

हिंदू-मुस्लीम भेदनितीचे जनक ब्रिटीश – डॉ यशवंतराव थोरात

कोल्हापूर : भारतात मनीमानसी रुजलेल्या हिंदू-मुस्लीम यांच्यातील भेदनितीचे जनक ब्रिटीश आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने ‘भारत-पाकिस्तान संबंध’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय विशेष व्याख्यानमालेमध्ये आज पहिल्या दिवशीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमबीए विभागाचे समन्वयक डॉ. अण्णासाहेब गुरव होते, तर ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार प्रमुख उपस्थित होते.

भाषणाच्या सुरवातीलाच भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान आपल्याला युद्ध हवे आहे की शांती?, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित करून डॉ. थोरात यांनी आपल्या मांडणीला प्रारंभ केला. ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती, खानपानाच्या सवयी, आवडीनिवडी अशा अनेक बाबींमध्ये साधर्म्य आहे. भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक हे एकमेकांपेक्षा फार वेगळे नाहीत; मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मात्र मूलभूत तात्त्विक फरक आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या, तर पाकिस्तान इस्लामिक राष्ट्रवादाच्या पायावर उभा आहे. भारतात १८५७च्या उठावानंतरच्या कालखंडात हिंदू-मुस्लीम भेदनितीचा उदय झाला. या उठावाने, आपण सारे एकत्र आलो, तर स्वातंत्र्य मिळवू शकतो, ही जाणीव भारतीयांना झाली. त्याचवेळी भारताला कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्य द्यावयाचे नाही, असे ब्रिटीशांनी ठरविले. ब्रिटीशांच्या परकीय धोरणाचा हा अधिकृत भाग होता. या धोरणाचाच भाग म्हणून ब्रिटीशांनी लॉर्ड कर्झनच्या कालखंडात बंगालमध्ये फाळणीच्या रुपाने हिंदू-मुस्लीमांमध्ये एकमेकांप्रती संशयाची आणि दुहीची बीजे पेरली. ब्रिटीशांमुळे आपल्याला हक्काचा प्रांत मिळाला, अशी उपकृततेची भावना मुस्लीम समाजात निर्माण झाली. त्यातून १९०६मध्ये मुस्लीम लीगचा उदय झाला आणि या देशात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे वसत असून त्यांना दोन स्वतंत्र देश असायला हवेत, ही भूमिका घेऊन लीगने पुढील प्रवास केला, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत भारतासोबत युद्ध करू शकत नाही, असे स्पष्ट करून डॉ. थोरात म्हणाले, पाकिस्तान पाच दिवसांपेक्षा अधिक युद्ध करू शकत नाही. युद्धाचा खर्च हा न परवडणारा असतो. त्याचप्रमाणे युद्ध करण्याबरोबरच युद्ध न करण्याचीही काही एक किंमत चुकवावी लागत असते. त्यातही हे दोन्ही देश अणवस्त्रसंपन्न आहेत. भारताने पाकिस्तानच्या लक्षणीय भूभागावर ताबा मिळविल्यास किंवा पाक सैन्याचे अपरिमित नुकसान केल्यास कोणत्याही क्षणी पारंपरिक युद्धाचे अणुयुद्धात रुपांतर होऊ शकते, हे अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे कदाचित हे देश एकमेकांशी प्रेमाने वर्तन करणार नाहीत, पण त्यांनी एकमेकांसमवेत राहायला मात्र शिकायला हवे.

डॉ. थोरात यांनी आजच्या व्याख्यानात भारत-पाकिस्तानच्या निर्मितीवेळची परिस्थिती, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये झालेला ठराव या अनुषंगाने आकारास आलेला इतिहास विस्तृतपणे विषद केला.

ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार म्हणाले, कोणताही इतिहास हा वस्तुस्थिती, दृष्टीकोन आणि त्याची आवाहकता यांमधून सामोरा येत असतो. त्या इतिहासाला आंतरराष्ट्रीय भू-राजकीय राजकारण आकार देत असते. त्या अंगानेच भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासाचे परिशीलन करायला हवे. काश्मीरी जनता ही कधीही पाकिस्तानसमवेत नव्हती, हे १९४८मध्येच सिद्ध झालेले आहे. त्यातही दोन तृतीअंश काश्मीर भारताने ताब्यात घेतले, हा भारताच्या युद्धनितीचा मोठा विजय होता. आजही आंतरराष्ट्रीय राजकारण वेगळ्या प्रकारचा दबाव या संबंधांवर टाकत आहे. त्यातून चीन आणि पाकिस्तान संबंधांचे एक नवे समीकरण आकाराला आलेले आहे. त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. गुरव म्हणाले, युद्ध नव्हे, तर शांतता हा विकासाचा पाया आहे. प्रगल्भ विचारप्रवाहांतून आपसांतील मतभेदद्वंद्व नियंत्रित करता येऊ शकते. हे मतभेद कमी करीत जाऊन चांगले सहजीवन नारिकांना प्रदान करणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने हितावह आहे. सुरवातीला डॉ. सुखदेव उंदरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी आभार मानले. यावेळी राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. उषा थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. नितीन माळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page