‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रा झुबेदा कादर आणि प्रा डॉ माधुरी देशपांडे सेवानिवृत्त
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्या वरिष्ठ प्राध्यापक डॉ. झुबेदा कादर आणि वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलातील प्राध्यापक डॉ. माधुरी देशपांडे या दि. २९ फेब्रुवारी रोजी नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्त त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये दि. २९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व साडी देऊन सहकुटुंब सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सिंकूकुमार सिंह, अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, सुनिल देशपांडे यांची उपस्थिती होती.
डॉ. झुबेदा कादर यांनी विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये २७ वर्ष वरिष्ठ प्राध्यापक म्हणून वर्षे सेवा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत १० विद्यार्थ्यांनी आपले पीएचडी संशोधन केले. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. डॉ. माधुरी देशपांडे यांनी जवळपास ३० वर्ष सेवा विद्यापीठाला दिली आहे. विद्यापीठामध्ये त्या तासिका तत्वावर रुजू होवून ते विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदापर्यंत त्यांनी शिखर गाठले. या दरम्यान त्यांनी संकुलाचे संचालक पदही भूषविले आहे. त्यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. तसेच विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदीही त्यांनी काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. त्यांनी १०० हून अधिक शोधनिबंध सादर केले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या पहिल्या महिला प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
सत्काराला उत्तर देतांना डॉ. देशपांडे म्हणाल्या की, माझ्या कार्यकाळात आलेल्या प्रत्येक कुलगुरूंनी मला कामाच्या जबाबदाऱ्या देवून चांगल्यात चांगले काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे ऋणनिर्देश करते. तसेच माझ्या कार्यकाळात सर्वांनीच मला सहकार्य केले त्यामुळे त्या सर्वांचे मी आभार मानते. या समारंभ कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दोन्हीही प्राध्यापकांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले आणि त्यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अश्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. देशपांडे यांच्या विषयी अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, प्रा. डॉ. संगीता माकोने, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उद्धव हंबर्डे आणि त्यांच्या नातलगांनी आपले मनोगत व्यक्त करून कौतुक केले.
याप्रसंगी मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, मा. अधिसभा सदस्य, अधिष्ठाता, संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही त्यांचे पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले.