खेलो इंडिया स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या पूनम कैथवासला रजत पदक
अमरावती : अखिल भारतीय विद्यापीठ संघ आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या वतीने गुवाहाटी (आसाम) येथे खेलो इंडिया स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथील पूनम कैथवास या खेळाडूने मुष्टियुद्ध स्पर्धेत 60 किलो वजन गटात उत्कृष्ट प्रदर्शन करून रजत पदक प्राप्त केले. देशभरातून सहभागी झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना पराजित करून प्राप्त केलेल्या या यशामुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर पडली आहे.
संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ. गजानन बढे, संत गजानन महाराज महाविद्यालय बोरगाव मंजू तर संघ व्यवस्थापक म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण डाबरे यांची नियुक्ती विद्यापीठाने केली होती. या घवघवीत यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य तसेच क्रीडा संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी पूनमचे अभिनंदन केले.