महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आयईईई’च्या ६ व्या परिषदेचे उद्घाटन संपन्न

संशोधनासाठी उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राने एकत्र येणे काळाची गरज – डॉ ओ जी काकडे

छत्रपती संभाजीनगर : देशामध्ये संशोधन आणि विकास यांच्यावर जीडीपीतील केवळ ०.७%  खर्च केला जातो. आज आपल्याला अशी एक व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे ज्यामध्ये उद्योग विश्वातून संशोधनासाठी निधीची पूर्तता होऊ शकेल. हा निधी उपलब्ध होण्यास्तव उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आयआयआयटी नागपूरचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे यांनी आज येथे केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत आयईईई’च्या बॉम्बे सेक्शन सिग्नेचर परिषदेचे उद्घाटन आज विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी डॉ.ओ. जी. काकडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. एच. एच. शिंदे, आयईईई बॉम्बे सेक्शनचे आनंद घारपुरे, विभागप्रमुख डॉ. शर्वरी तामणे, डॉ सोनल देशमुख, डॉ एस घोष, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

Advertisement

पुढे बोलताना डॉ. काकडे म्हणाले, आपण अडथळ्यांच्या काळामध्ये जगत आहोत. २०१९ मध्ये आपल्यावर कोव्हिड चे संकट आले मात्र, त्याकडे सकारात्मकपणे पाहिले तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झाले.  आपल्या देशातील संशोधनाचा विचार केल्यास लक्षात येते की, अधिकात अधिक संशोधन हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये झालेले दिसते. संशोधन हे केवळ प्रसिद्ध करण्यासाठी नसून संशोधकाने मूळ समस्येवर काम करीत संशोधन करणे अधिक महत्वपूर्ण आहे. संशोधनाचा प्रत्यक्षात कमी वापर होताना दिसतो कारण, उद्योग आणि समाजाला अपेक्षित असणारे आणि त्यांची मागणी पूर्ण करणारे संशोधन होताना दिसत नाही.

एमजीएम विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण आपण उपलब्ध करून दिले आहे. ‘टास्क फोर्स रिसर्च’ माध्यमातून संशोधन होणे आवश्यक असून या माध्यमातून एक समस्या घेऊन अनेक संशोधक तो सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. बहुविद्याशाखीय शिक्षणासमवेत आपल्याला बहुविद्याशाखीय संशोधन करणे ही काळाची आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी यावेळी सांगितले.

कुलसचिव डॉ. गाडेकर यावेळी बोलताना म्हणाले, एमजीएम विद्यापीठाने पाचव्या वर्षात पदार्पण केले असून एमजीएम गेल्या चार दशकांपासून विविध क्षेत्रात कार्य करीत आलेले आहे. बहुविद्याशाखीय शिक्षण इथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. एमजीएम विद्यापीठ विविध क्षेत्रातील संस्थांशी सामंजस्य करार करून विद्यार्थी हिताचे वेगगेगळे उपक्रम राबवित आले आहे.   

ही परिषद ‘फ्रंटियर्स ऑफ टेक्नॉलॉजीस : फ्यूएलिंग प्रॉस्परिटी ऑफ दि प्लॅनेट अँड पीपल’ या संकल्पनेवर आधारित आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. शर्वरी तामणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहसीन अंसारी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सोनल देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page