एमजीएममध्ये सर सी व्ही रमण व्याख्यानमालेचे उद्घाटन संपन्न
भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आत्मनिर्भर बनवले – शास्त्रज्ञ प्रा. जे. व्ही. याखमी
छत्रपती संभाजीनगर : देशाला विकसित भारत बनविण्यामध्ये अनेक क्षेत्रातील लोकांचे योगदान असून सामान्य नागरिक दररोज देशाच्या विकासात देत असलेल्या योगदानास आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. देशाला जर कोणी आत्मनिर्भर बनवले असेल तर ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाने बनवले आहे, असे प्रतिपादन भाभा अणु संशोधन केंद्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. जे. व्ही. याखमी यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान विद्याशाखेच्यावतीने (एसबास) आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सर सी. व्ही.रमण व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, शास्त्रज्ञ प्रा.जे.व्ही.याखमी यांनी ‘काँट्रीब्युशन्स ऑफ फिजिक्स टू मेडिकल टेक्नॉलॉजीस फॉर हेल्थकेयर’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, विभागप्रमुख प्रा.डॉ.के. एम.जाधव, विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. जे. व्ही. याखमी म्हणाले, जगातील इतर देशातील यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा भारतीय विद्यार्थी यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे, कारण आपल्याकडे महात्मा गांधीजींचे विचार आहेत. समकालीन काळामध्ये चॅटजीपिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले असून अशा गोष्टी काहीएक ठराविक काळानंतर सातत्यपूर्ण येत असतात.
भाभा अणु संशोधन केंद्र गेल्या अनेक दशकांपासून भारतीय बनवटीचे वेगवेगळी उपकरणे बनवत आले आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये भौतिकशास्त्राचे एक विशेष महत्व असून या क्षेत्रातील अनेक उपकरणे ही भौतिकशास्त्राच्या तत्वावर अवलंबून आहेत. एमजीएम ही बहूविद्याशाखीय शिक्षण देणारी संस्था असून येणारा काळ हा बहूविद्याशाखीय शिक्षणाचा आहे. भविष्यकाळात या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे शक्य होणार असल्याचे प्रा.जे. व्ही. याखमी यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले, एमजीएम विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी केली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आंतरविद्याशाखीय आणि बहूविद्याशाखीय शिक्षण हे महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी या पद्धतीचे शिक्षण शिकणे ही काळाची गरज आहे.
दुपारच्या सत्रामध्ये भाभा अणु संशोधन केंद्रातील फ्युल केमिस्ट्री विभागाचे डॉ. राजेश पै यांनी ‘फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ पोरस मटेरियल्स : ऍन इन्साईट टू मेटल ऑरगॅनिक फ्रेमवर्क्स अँड देयर ऍप्लिकेशन्स’ या विषयावर तर मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. वैशाली बंबोले यांनी ‘ अनमॅन्ड सिस्टीम विथ ह्युमन – लाईक – सेल्फ – अवेरनेस कॅपॅबिलिटीज’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.डॉ.के. एम.जाधव केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पी देवांगण व डॉ. मिनाक्षी मारू यांनी केले तर आभार प्रा.डॉ. क्रांती झाकडे यांनी मानले.
नोबेल पारितोषिक विजेते प्रा. जीन- मेरी लेन यांना ऐकण्याची संधी
या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रामध्ये दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ प्रा.जीन- मेरी लेन यांना दुरचित्रप्रणालीद्वारे ऐकण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘स्टेप्स टुवर्ड्स कॉम्प्लेक्स मॅटर : केमिस्ट्री’ या विषयावर प्रा. लेन बोलणार आहेत. प्रा.जीन- मेरी लेन यांना सन १९८७ साली रसायनशास्त्रातील सुप्रामॉलिक्युलर संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे.