‘स्वारातीम’ विद्यापीठात भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न
नांदेड : कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन विभागीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समारोप व बक्षीस वितरणप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. संतराम मुंडे, क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. संतोष देवसरकर, स्पर्धेचे समन्वयक डॉ. क्रांती मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अखंड हिंदुस्थानचे ऊर्जा केंद्र असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य शब्दाच्या अभिव्यक्ती बरोबरच रांगोळीच्या माध्यमातून साकारले जावे. या पवित्र हेतूने छत्रपती शिवरायांच्या जीवनातील घटना प्रसंगांवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले होते.
दि.२३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील हॉल क्रमांक ३११ मध्ये संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन विभागीय रांगोळी स्पर्धेमध्ये नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
संत ज्ञानेश्वर चित्रकला महाविद्यालय परभणी येथील हनुमंत पांचाळ यानी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर गायत्री सोळंकी (यशवंत महाविद्यालय नांदेड) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर पठाण इरफान खान उस्मान खान (दयानंद कला महाविद्यालय लातूर) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
श्वेताराणी वांजे (दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर), ऋतुजा मंत्री (सीपीसी लातूर), अंकिता दीक्षित (दयानंद महाविद्यालय लातूर ) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५,००० रू., ३,००० रू. व २,००० रू. रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून ललित कलातज्ञ सिद्धार्थ नागठाणकर, अमोल सालमोठे, वसंत गाडेकर यांनी काम पाहिले.
प्रा. गजानन इंगोले यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. क्रांती मोरे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजक डॉ. मीना कदम, डॉ. उर्मिला धाराशिवे कार्यालयीन कर्मचारी संभा कांबळे, बालाजी शिंदे, जीवन बारसे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेला विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.