‘स्वारातीम’ विद्यापीठाची स्पर्धा यापुढे पुणे विद्यापीठाशी होणार आहे – कुलगुरू डॉ मनोहर चासकर
नांदेड : शिवभूमीतून संतांच्या भूमीत काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. पुणे विद्यापीठातील गेली वीस वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. आपण सर्व एकत्रपणे काम करून या विद्यापीठाचा कायापालट करू, त्यासाठी यापुढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्पर्धा ही पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी होणार आहे. असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
डॉ. चासकर दि. २६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठामध्ये आयोजित नवनियुक्त कुलगुरूंच्या स्वागत समारंभ तथा तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आणि प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे यांच्या सेवापूर्ती समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखा अधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी.एन. मोरे, डॉ. संतराम मुंडे, इंजि. नारायण चौधरी यांची उपस्थिती होती.
पुढे डॉ. चासकर म्हणाले की, येणाऱ्या पाच वर्षात या विद्यापीठाला एक वेगळी दिशा देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. या विद्यापीठाचे दिवे रात्रभर चालू असावेत जेणेकरून संशोधन विद्यार्थ्यांना त्यांचे काम प्रयोगशाळेमध्ये रात्रभर करता येईल. येणाऱ्या पाच वर्षात या विद्यापीठाला आपल्या सर्वांच्या सहकार्याने एका उंचीवर नेता येईल. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन कुलगुरू डॉ. चासकर यांनी सन्मान केला. त्यांच्या मानपत्राचे वाचन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले. त्याचबरोबर माजी प्र-कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे यांचाही सन्मान शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन कुलगुरू डॉ. चासकर यांनी केला. त्यांच्या मानपत्राचे वाचन डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले. दोन्ही सेवापूर्ती सत्कार मूर्तींनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर नेटके यांनी मानले.