एमजीएममध्ये नोबेल पारितोषिक विजेते प्रा जीन – मेरी लेन यांना ऐकण्याची संधी
एमजीएममध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर सी. व्ही.रमण व्याख्यानमालेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान विद्याशाखेच्यावतीने (एसबास) दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ व दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान दोन दिवसीय सर सी. व्ही.रमण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रामध्ये नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ प्रा. जीन- मेरी लेन यांना दुरचित्रप्रणालीद्वारे ऐकण्याची संधी विज्ञानप्रेमींना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘स्टेप्स टुवर्ड्स कॉम्प्लेक्स मॅटर : केमिस्ट्री’ या विषयावर प्रा. लेन बोलणार आहेत. प्रा.जीन- मेरी लेन यांना सन १९८७ साली रसायनशास्त्रातील सुप्रामॉलिक्युलर संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे.
या दोन दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात होणार आहे. उद्घाटनपर सत्रात भाभा अणु संशोधन केंद्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ प्रा. जे. व्ही. याखमी हे ‘काँट्रीब्युशन्स ऑफ फिजिक्स टू मेडिकल टेक्नॉलॉजीस फॉर हेल्थकेयर’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. प्रा.याखमी यांचे व्याख्यान झाल्यानंतर याच दिवशी डॉ. राजेश पै, प्रा. वैशाली बंबोले हे विषयतज्ञ आपापल्या विषयावर बोलणार आहेत. तसेच दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रा. सी.के. जयशंकर, प्रा. एस. टी. बेंद्रे हे विज्ञानप्रेमिंशी संवाद साधणार आहेत.
या व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, संचालक डॉ. ए. एस. खेमनर, विभागप्रमुख प्रा. डॉ. के. एम. जाधव व सर्व संबंधित उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेस सर्वांना खुला प्रवेश असून विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी करण्यासाठी www.mgmu.ac.in या संकेतस्थळास भेट देऊन इच्छुक आपले नाव नोंदवू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रा. डॉ. के. एम.जाधव – ९४२२६८६०६१ व प्रा. प्रणय दिवटे – ९९६०५७०५४६ यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.