हिंदी विश्वविद्यालयातील केंद्रीय विद्यालयाने तायक्वांडो खेळाडू श्रावणी हिचा केला सन्मान
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील केंद्रीय विद्यालयामधील नवव्या वर्गातील विद्यार्थीनी श्रावणी चुटे हिचा तायक्वांडो स्पर्धेत व्दितीय स्थान प्राप्त केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. श्रावणीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय विद्यालय संघटनेच्या 52व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा गांधीनगर, अहमदाबाद येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत श्रावणी चुटे हिने ताइक्वांडो खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय स्थान पटकावले व रजत पदक तसेच आठ हजार रुपयाचा रोख पुरस्कार प्राप्त केला.
श्रावणीच्या या उपलब्धीनिमित्त तिची आई शिल्पा व वडील संजय चुटे यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य संध्या निमजे यांनी श्रावणीसह इतर खेळाडूंना खेळात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले. क्रीडा शिक्षक अमरेश कुमार शुक्ला यांनी ताइक्वांडो व विविध क्रीडा स्पर्धांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी श्रावणीसह तिच्या आई-वडीलांचाही सन्मान करण्यात आला.