उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाचे थेट प्रक्षेपण
जळगाव : देशातील सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आर्थिक मदत देणाऱ्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान प्रकल्पाचे डिजीटल लाँचिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात करण्यात आली होती. दरम्यान या योजनेअंतर्गत कबचौ उमविला २० कोटी रूपये जाहीर झाले आहेत.
भारत सरकाच्या शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणाला बळकटी देण्यासाठी देशातील सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना १२,९२६.१० कोटी रूपयांच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाला मान्यता दिली आहे. या अभियानाचे डिजीटल लाँचिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या योजनेत २० कोटी रूपये जाहीर झाले आहेत. या डिजीटल लाँचिंगचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात करण्यात आली होती. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले. जवळपास तीनशे जणांनी याचा लाभ घेतला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी विद्यापीठाला जाहीर झालेल्या २० कोटी रूपयांमधून कोणती विकासकामे केली जाणार आहेत याची माहिती सभागृहाला दिली.