एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या मुद्रणचित्रांची कला उत्सवासाठी निवड
रंगनाथ, प्रसादच्या कलाकृतींना अनुक्रमे प्रथम, तृतीय पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या लिओनार्दो द विंची स्कूल ऑफ डिझाईनमधील विद्यार्थी रंगनाथ वेताळ आणि प्रसाद गायकवाड यांनी अंतरराज्य कला उत्सवामध्ये अनुक्रमे प्रथम आणि तृतीय पुरस्कार पटकवला आहे. एमजीएम विद्यापीठाच्या ललित कला विभागातील अन्य विद्यार्थी वैष्णवी देशमुख, भाग्यश्री घोडके, प्रांजली खुपसे, श्रद्धा जोशी, सेजल कुलकर्णी तसेच उपयोजित कला विभागाच्या आकांक्षा देव, पुजा शेळके या विद्यार्थीनींच्या मुद्रण कलाकृतींची या उत्सवासाठी तज्ज्ञांच्या समितीतर्फे निवड करण्यात आली होती. येथील यशवंतकला महाविद्यालयातर्फे आयोजित या प्रतिष्ठेच्या कला उत्सवामध्ये रंगनाथ आणि प्रसाद हे दोघे रोख रकमेच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.
रंगनाथने या रंगउत्सवासाठी ऊसतोड कामगारांची व्यथा मांडणारे `संघर्ष` मुद्रण चित्र सादर केले होते. त्याने या कलाकृतीसाठी इचिंग आणि आयर्न प्लेटचा उपयोग केला. प्रसादने अंधश्रद्धा निर्मुलनाचा संदेश देणारी कलाकृती इचिंग झिंक प्लेटद्वारे सादर केली.
विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी शाबासकी दिली असून त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले आहे. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांना प्रा. सचिन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.