उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या मैदानावर क्रीडा ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी.इंगळे, व्य. प. सदस्य तथा आयोजन समितीचे कार्याध्यक्ष ॲड अमोल पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य ॲड केतन ढाके, स्वप्नाली महाजन, दिनेश खरात तसेच प्रा. के. एफ. पवार, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. सचिन नांद्रे, प्रा. समिर नारखेडे, इंजि. आर. आय. पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना कुलगुरू म्हणाले की, खेळात संघ भावना महत्वाची असून खेळाडूंनी खिलाडू वृत्ती जोपासणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व हे स्पर्धांमधून निर्माण होत असते असेही ते म्हणाले, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रा. जी. ए. उस्मानी यांनी सुत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा संचालक प्रा.विजय पाटील, प्रा. पी. आर. चौधरी, प्रा. शैलेश पाटील, प्रा. संजय भावसार, प्रा. देवदत्त पाटील व प्रा. अमोल पाटील उपस्थित होते.
रविवारी चार मैदानांवर झालेल्या दुपारच्या सत्रात अ गटात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती ब गटात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, क गटात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तर ड गटात सरदार पटेल विद्यापीठ गुजराथ यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
अ गटातील सामना सावखेडयाच्या महेंद्र कोठारी क्रीडांगणावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विरूध्द संदीप विद्यापीठ नाशिक यांच्यात झाला. अमरावती विद्यापीठाने २० षटकात ९ बाद १९९ धावा केल्या प्रत्युत्तरात संदीप विद्यापीठाचा संघ १३.४ षटकात बाद झाल्यामुळे अमरावती विद्यापीठ १३४ धावांनी विजयी झाले. अमरावती विद्यापीठाचा रिंकू चिकारा हा सामनावीर ठरला.
ब गटातील सामना मु. जे महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडांगणावर महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यात झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २० षटकात ९ बाद ११५ धावा केल्या. महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाचा संघ २० षटकात ९ बाद ९९ धावा करू शकला. १६ धावांनी कृषी विद्यापीठ विजयी झाले. सिध्देश गरूड हा सामनावीर ठरला.
क गटातील सामना अनुभुती शाळेच्या मैदानावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर व सार्वजनीक विद्यापीठ सुरत यांच्यात रंगला. नागपुर विद्यापीठाने २० षटकात ५ बाद १४३ धावा केल्या. तर सार्वजनिक विद्यापीठ सुरतच्या संघाने कडवी लढत दिली. मात्र १९.५ षटकात १३३ धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. १० धावांनी नागपूर विद्यापीठ संघ विजयी झाला. कौस्तुभ साळवे हा सामनावीर ठरला.
ड गटात विद्यापीठाच्या मैदानावर सरदार पटेल विद्यापीठ गुजराथ आणि गणपत विद्यापीठ गुजराथ यांच्यात झाला. गणपत विद्यापीठाचा संघ १६ षटकातच केवळ ६६ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात सरदार पटेल संघाने ७.३ षटकात ३ गडी गमावून ६९ धावा करीत ७ गडी राखून हा सामना जिंकला. कृष्णा पटेल हा सामनावीर ठरला. त्याला कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.