शिवरायांच्या जयघोषात सोलापूर विद्यापीठाकडून शिवराज्याभिषेक रॅली उत्साहात

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत तसेच हर हर महादेवचा नारा देत शनिवारी शहरातून शिवराज्याभिषेक रॅली उत्साहात निघाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त या रॅलीचे तसेच चित्ररथ देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच मावळ्यांची वेशभूषा परिधान करून सहभाग घेत शिवरायांचा जयघोष केला.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणात या रॅलीचे उद्घाटन प्र कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड, प्राचार्य ई. जा. तांबोळी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

नार्थकोट प्रशालेतून निघालेली ही रॅली डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, सरस्वती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला.  त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे मार्गस्थ झाला. शिवराज्याभिषेक रॅलीमध्ये हिराचंद नेमचंद कॉलेज, वालचंद कॉलेज, शिवाजी रात्र महाविद्यालय, शिवदारे फार्मसी कॉलेज, विद्यापीठ अधिविभाग, बुर्ला कॉलेज, डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

शिवरायांचे विचार आचरणात आणून राष्ट्रासाठी युवकांनी कांनी काम करावे: प्रा. बिसेन
सोलापूर विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार, विचार आचरणात आणून युवकांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एनएसएस विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. बिसेन हे बोलत होते. ‘जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page