यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ABC ID च्या नोंदणीमध्ये उल्लेखनिय कामगिरी
केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांचे हस्ते विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांचा गौरव
नाशिक : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ABC ID च्या नोंदणीमध्ये विविध शैक्षणिक संस्थांच्या सहभागामुळे 25 कोटीचा टप्पा पार पाडल्यामुळे, दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी द अशोक, चाणक्यनगरी, नवी दिल्ली येथे अपार (APAAR – Automated Permanent Academic Account Registry) या राष्टीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वन नेशन वन स्टुडंट आयडी या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी 12 अंकी ABC ID/APAAR ID तयार केलेला असल्यामुळे, संपूर्ण भारतातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास सुरळीत व एकसंघ करणे यामुळे शक्य होणार आहे. अपारआयडीवर विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक कारकीर्द डीजीटल स्वरूपात उपलब्ध असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP 2020) च्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये अपारची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना अपारआयडी तयार करणे आवश्यक असणार असल्यामुळे, विद्यार्थ्याने शैक्षणिक कालखंडामध्ये प्राप्त केलेली शैक्षणिक गुणवत्ता, क्रेडीट इत्यादी कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत असे केंद्रिय शिक्षण आणि कौशल्यविकास आणि उद्योजकता विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विशद केले.
ABC ID /APAAR ID नोंदणीचा 25 कोटीचा टप्पा गाठण्यामध्ये भारतातील ज्या विद्यापीठांनी उल्लेखनिय कामगिरी केलेल्या चार विद्यापीठांना या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यक्रमात, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ABC ID/APAAR ID नोंदणीमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्यामुळे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांचा केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या समारंभास विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील व संगणक केंद्र प्रमुख प्रदीप पवार हे उपस्थित होते.
आपले विचार व्यक्त करतांना कुलगुरू प्रा. संजीव सोवनणे यांनी सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २९ जुलै २०२१ रोजी एबीसी पोर्टल लाँच केले आणि त्वरित मुक्त विद्यापीठाने त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन केले. आजपर्यंत 6,31,111 इतक्या विद्यार्थ्यांचे ABC ID/APAAR ID तयार केलेले असून डीजीलॉकर पोर्टलवर, 16,89,739 पदवी/ पदविका व 2,35,505 गुणपत्रके अपलोड केल्या असून, सर्व विद्यार्थ्यांचे पदवी / पदविका प्रमाणपत्रे ही दीक्षांत समारंभानंतर ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्याना डाऊनलोडसाठी उपलब्ध असतात व उल्लेखनिय कामगिरी कशा पध्दतीने पार पाडली याबाबत सभागृहाला संबोधित केले.
या गौरवामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोव लागेला आहे. या प्रशंसनीय कामगिरीमुळे शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास गोविंद जैस्वाल, सहसचिव, उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, डॉ. किशोरसिंह चावडा, कुलगुरू, विर नर्मद साऊथ गुजरात विद्यापीठ, प्रा. निलिमा गुप्ता, कुलगुरू, डॉ. हरीसिंह गौर सागर विद्यापीठ, प्रा. अनिल सहस्त्रबुध्दे, NETF उपस्थित होते.