पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्रास रु. १.० कोटी रक्कमेचा मॉडेल नर्सरी प्रस्ताव मंजूर
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, जि. पुणे या केंद्रास एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचेकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत सिताफळ, अंजीर व इतर पिकांसाठी चार हेक्टर क्षेत्रावर आदर्श रोपवाटीका स्थापन करण्यासाठी रु. १.० कोटी रक्कमेचे अनुदान प्राप्त झाले आहे अशी माहिती कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. सदरच्या अनुदानातून गणेशखिंड केंद्राच्या रोपवाटीकेत अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. या अनुदानातून संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेमध्ये तारेचे कुंपन, पॉलिहाऊस, मिस्ट युनिट चेंबर, शेडनेट हाऊस, माती मिश्रण निर्जंतुकीकरण युनिट, पाणी साठवणूकीच्या सुविधा, फॉगर्स, मिस्टरस, ठिबक सिंचन, मातृवृक्षांची लागवड इ. सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे संशोधन केंद्राच्या रोपवाटीकेमधून विविध फळझाडांच्या शुध्द, दर्जेदार व चांगल्या गुणवत्तेच्या कलमे रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यास मदत होणार आहे.
विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे केंद्रास प्राप्त झालेल्या अनुदानाबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ. रविंद्र बनसोड, प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. बी.व्ही. गोंधळी, डॉ. व्ही. के. गरांडे, प्रा. एन. बी. शेख आणि डॉ. एस.पी. गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी आय. आय. एच. आर., बेंगलोर येथे असलेल्या रोपवाटीकेच्या धर्तीवर विद्यापीठाच्या रोपवाटीकेचे ऑटोमायझेशन करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.