गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत ८४ वे रावबहादूर आर आर काळे स्मृती व्याख्यान संपन्न
कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता माणसाच्या पुढे जाणे ठरू शकते धोकादायक – मायकल स्पेन्स
पुणे : सध्या जगात सगळीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रावर होणारे परिणाम चर्चिले जात आहेत. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता विकसित करत असताना ती मानवी क्षमता डोळ्यापुढे ठेवून केली जात आहे. परंतु भविष्यात ही क्षमता मानवी क्षमतेच्या पेक्षा जास्त पातळीवर विकसित केल्या गेल्यास ती परिस्थिती धोकायक ठरू शकते. त्यासाठी नजीकच्या भविष्यात नियंत्रण किंवा नियमनाची गरज भासेल व ही गरज विविध देशांसाठी त्यांच्या स्थानिक निकषांनुसार वेगवेगळी असेल असे मत नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ मायकल स्पेन्स यांनी व्यक्त केले. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे आयोजित ८४ व्या काळे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. सदर व्याख्यान संस्थेच्या काळे सभागृहात संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ अजित रानडे उपस्थित होते.
मायकल स्पेन्स म्हणाले की गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक स्तरावर काही मोठे बदल घडले. त्यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणून आशिया खंड उदयास आले. मोठ्या प्रमाणात डिजिटल क्रांती झाली. वैद्यकीय क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण होत आहे. तसेच शाश्वत उर्जा याकडे वेगाने वाटचाल सुरु झाली आहे आणि या सर्व बदलांच्या मुळाशी आहे ते आधुनिक तंत्रज्ञान, त्याची वाढलेली व्याप्ती व त्याची आव्याक्यात आलेली किंमत. ते पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रावर परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये काही सकारात्मक आहेत. एखाद्या कामाला लागणारा बराच वेळ यामुळे कमी होताना दिसतोय असे सांगत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा ३० टक्क्यांहून अधिक वेळ हा रीपोर्ट अथवा संशोधन अहवाल लिहिण्यातच जातो. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्याचा पहिला आरखडा तयार करता येत असल्याने वेळेची मोठी बचत होते. तसेच इमेजिंगच्या माधातून आता त्वचेचा कर्करोग ओळखणे कसे सोपे आणि वेगवान झाले आहे. आपल्या आहारात अत्यंत महत्वाचे असलेले प्रोटीनची त्रिमितीय रचना समजून घेण्यात देखील कृत्रिम बुद्धिमत्तेने मोठे योगदान दिले आहे. अशी विविध उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.
आपल्या भाषणात त्यांनी केलेल्या एका शोधनिबंधाची माहिती दिली. त्यामध्ये उत्पादन क्षमतेत दिसू लागलेला मंदीवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तोडगा काढता येईल का? या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले आहेत. सदर शोधनिबंध त्यांनी जेम्स मनयिका यांच्या समवेत लिहिला आहे. यामध्ये सद्य परिस्थितीत पुरवठा साखळी व्यवस्थापन व त्याचे महत्व या विषयावर त्यांनी भाष्य केले आहे.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे सहसंस्थापक रावबहादूर आर. आर. काळे यांच्या स्मृतीत सदर व्याख्यानाचे दरवर्षी आयोजन केले जाते. आजवर या उपक्रमात देश विदेशातील विविध मान्यवरांनी आपले अर्थशास्त्र विषयक विचार मांडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, अभिजित बॅनर्जी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, रघुराम राजन आदींचा समावेश आहे.