गोंडवाना विद्यापीठात तीन दिवसीय अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन
खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते – म्युझिकल मोटिव्हेशनल स्पीकर व आयफा पुरस्कार विजेते कैलाश तानकर
गडचिरोली : क्रीडा आणि कलेला दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आपल आयुष्य घडत असून कामातील ताण कमी होत असतो. आपल्यातील कलेला प्रोत्साहन दिल्यामुळे आपण कसं घडत जातो हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितलं. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते असे मत म्युझिकल मोटिव्हेशनल स्पीकर आयफा पुरस्कार विजेते तसेच निवृत्त पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांनी व्यक्त केले. अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे उद्घाटन आज गोंडवाना विद्यापीठात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर ज्येष्ठ कलावंत नाटककार व दिग्दर्शक विरेंद्र गणवीर ,अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वित्त व लेखाधिकारी सी. ए.भास्कर पठारे, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. अनिता लोखंडे, संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम, अनुप ढोरे , सिनेट सदस्य तसेच कर्मचारी संघटनेचे सचिव सतीश पडोळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना प्रशांत रंदई, महासचिव अरुण जुनघरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ कलावंत, नाटककार व दिगदर्शक विरेंद्र गणवीर म्हणाले, झाडीपट्टी रंगभूमीने अनेक कलावंत दिले आहे. झाडेपट्टी रंगभूमीची उलाढाल लाखोंच्या घरात आहे. गडचिरोली जिल्हा हा कलेने समृद्ध आहे. कलेच्या माध्यमातून नवीन संस्कृती निर्माण होत असते त्यामुळे आपली कला ही टिकवली पाहिजे आणि त्याचा वसा हा येणाऱ्या पिढीकडे दिला पाहिजे असे ते म्हणाले,
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना डॉ. अनिल हिरेखण म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यापीठाने हा अमृतचा मंच उपलब्ध करून दिलेला आहे . कामाच्या व्यस्ततेतही आपल्यातील कला जपून ती वृद्धींगत केली पाहिजे.त्यामुळे कामाचा ताण कमी होतो. प्रत्येकामध्येच राजहंस दडलेला असतो. असे ते म्हणाले. यावेळी म्युझिकल मोटिव्हेशनल स्पीकर व आयफा पुरस्कार विजेते कैलाश तानकर, आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी उपस्थित शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आग्राहास्तव गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. या महोत्सवात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सलंग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रास्ताविक संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. अनिता लोखंडे, संचालन मराठीचे विभागाचे स. प्रा. डॉ. हेमराज निखाडे, आभार, संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.