सोलापूर विद्यापीठात ‘उद्योग विद्यापीठ सहयोग’ वर कार्यशाळा उत्साहात संपन्न
शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा – कुलगुरू प्रा. डॉ. महानवर
सोलापूर : देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजेस विभागाच्यावतीने “उद्योग विद्यापीठ सहयोग” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते.
या कार्यशाळेत प्राचार्य अजय देशमुख आणि नवउद्योग तज्ञ सतीश रानडे यांनी शैक्षणिक संस्था, महाविद्यालय आणि विविध कंपन्या यांना एकत्रित येण्यामध्ये आलेले वेगवेगळे अडथळे कथन केले. हे अडथळे कमी करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. शैक्षणिक संस्था आणि आस्थापना या दोघांनाही परस्पर सामंजस्याची आणि एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनक्युबेशन सेंटरचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. विकास पाटील यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उद्यम केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास पाटील, सहव्यवस्थापक नलगेशी तसेच नले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.
विकसित भारतासाठी उद्योजक पिढी घडवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित ‘उद्योग विद्यापीठ सहयोग’ कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उद्योजक पिढी घडून समृद्ध भारत तसेच विकसित भारत होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.