क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको – शारदा उग्रा
कोल्हापूर : भारताला क्रीडा क्षेत्रात मोठी संधी आहे. येथील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. क्रीडा क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप कमी झाल्यास भारताचे या क्षेत्रातील भवितव्य उज्वल आहे, असे मत ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्रा यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित क्रीडा पत्रकारिता या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर होते. यावेळी जागतिक बँकेच्या अधिकारी रेक्सॉनी हकीम यांची विशेष उपस्थिती होती. शारदा उग्रा म्हणाल्या, गेल्या काही वर्षात भारतातील खेडाळूंकडून चांगला खेळ होत आहे. केवळ क्रिकेट म्हणजे संपूर्ण क्रीडा विश्व नाही. इतर खेळांकडेही खास लक्ष पुरविले पाहिजे. खेळाडूंना उत्तम सुविधा दिल्या पाहिजेत. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर सातत्याने स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहित केले पाहिजे. यातून चांगले खेळाडू घडतील आणि ते देशासाठी विविध पदके आणतील. मात्र क्रीडा क्षेत्रात वाढता राजकीय हस्तक्षेप चिंतेचा विषय आहे. राजकीय हस्तक्षेप कमी झाला आणि संघटनात्मक पातळीवरी निर्णयात पारदर्शकता आल्यास भारतीय क्रीडा क्षेत्राला अजून चांगले दिवस येतील. मात्र, यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी.
त्या म्हणाल्या, क्रीडा पत्रकारांनी वस्तुस्थिती मांडण्यावर विशेष भर द्यावा. महिला पत्रकारांसाठी या क्षेत्राकडे सुरक्षित आणि चांगल्या करिअरची संधी म्हणून पहावे. क्रीडा बातमी लिहित असताना संतुलन आवश्यक आहे. किंबहुना इतरांपेक्षा वेगळी माहिती मिळविण्यावर पत्रकारांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. यातून नवीन विषय आणि दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होईल. ज्येष्ठ संपादक पारेकर यांनी पत्रकारितेतील बदलांची नाेंंद घेत विविध उदाहरणांच्या सहाय्याने अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्याचे स्वागत डॉ. सुमेधा साळुंखे आणि डॉ. प्रसाद ठाकूर यांनी केले. परिचय साईसिमरन घाशी हिने करून दिला. सूत्रसंचालन मेघा मोहिते हिने केले. आभार मेलिना कालीचूर्ण हिने मानले. यावेळी पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, इतिहास विभागाच्या माजी प्रमुख डॉ. नंदा पारेकर, संजय घोडावत विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख जयप्रकाश पाटील, डॉ. राजेंद्र भस्मे यांच्यासह शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे तसेच तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फक्त पैसा नको; न्यायही हवा
नवी दिल्ली येथे महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाचा खेळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या क्षेत्रामध्ये मुलींना करिअरची संधी देताना पालक विचार करतील. महिला कुस्तीगीरांसाठी खूप पैसे ओतून सुख- सुविधा देणे एवढेच अपेक्षित नाही; तर एखाद्या महिला खेळाडूवर अन्याय होत असेल तर तिला न्यायही मिळाला पाहिजे. आपण देशात न्यायाधारीत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत शारदा उग्रा यांनी व्यक्त केले.
फोटो ः क्रीडा पत्रकारिता या विषयावर बोलताना ख्यातनाम क्रीडा पत्रकार शारदा उग्रा. समोर उपस्थित विद्यार्थी.