पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
भारताने लोकशाही टिकवून ठेवली – डॉ. शुजा शाकीर
छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: बदलती राजकीय आव्हाने आणि समकालीन परिदृश्य या विषयावर दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोकशाहीच्या सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकताना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपल्या हाती काय लागले ? आणि काय वाहून गेले? या विषयाचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे विचार मांडताना ते पुढे म्हणाले की, 1947ला स्वातंत्र्यानंतर भारत खऱ्या अर्थाने एक देश नव्हता, देशाचे स्वरूप, शासन, कायदे अधिकार यात विविधता होती. भारताचा इतिहास हिंसक स्वरूपाचा राहिला होता. प्रत्येक जातीला कसा न्याय देता येईल हा सामाजिक प्रश्न भारतापुढे उभा होता. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या कालखंडात अनेक राजकारण्या़नी सामाजिक न्याय कसा प्रस्थापित करता येईल, या प्रश्नावर लक्ष दिले होते.
लोकांना रोजगार द्या त्यामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी काँग्रेसची धारणा होती. ज्या देशात,जात धर्म, पंथ, आहे त्या देशात लोकशाही टिकू शकणार नाही, असे अनेक देशांचे मत होते, अशा परिस्थितीमध्ये भारताने लोकशाही टिकवून ठेवली असे उद्गार त्यांनी काढले. गरिबीसाठी मनरेगापर्यंत काँग्रेसने राबवलेले धोरण पूर्णत्वाने सामाजिक होते.तसेच काँग्रेसने आरक्षणासारखे सामाजिक विषय राबविले. मोदी सरकारने जनतेच्या आर्थिकतेला प्राधान्य दिले. आजच्या परिस्थितीत लोकशाहीला घसरन लागलेली आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली सर्वात जास्त लोक आज तुरुंगात आहेत. 2015 -16 पासून आज पर्यंत 17000 एनजीओ लायसन्स रद्द करण्यात आले. आणिआज स्टॅंडर्ड वर लोकशाहीचा मुद्दा घसरलेला आहे, असे विचार त्यांनी मांडले. बीज भाषण हिमाचल प्रदेशच्या सिमला विद्यापीठाचे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ. विकास सिंह यांनी करताना भारतात स्वातंत्र्यापासून सामाजिक,आर्थिक बाबतीत अनेक संकटे आलेत. देशाला एका ठिकाणी बांधण्याकरता अनेक अडचणी समोर उभ्या राहिल्या. आज जातिवादाची तीव्रता व्यापक रूप धारण करताना दिसते. येथे अनेक प्रश्नांसाठी आंदोलने झाली. खलिस्तानची स्थापना झाली पाहिजे, असे अनेक प्रश्न डोके वर काढत होते.
आसाम, मणिपूर नागालँड येथे अनेक आंदोलन झाली. दहशतवादाने देशाच्या विकासावर अनेक प्रश्न उभे केले. आज भारतापुढे गरिबी, रोजगारी, जातिवाद, भ्रष्टाचार पर्यावरण प्रदूषण असे अनेक प्रश्न समोर उभे राहिलेले आहेत, त्यावर अनेक उपाय योजना करण्यात आल्या. असे प्रतिपादन केले. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मून अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की, आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, भारत कोणकोणत्या दिशेने बदलत गेला, याचा आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार प्रदीर्घकाळ या ठिकाणी राहिले. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी आपल्या देशाची व्याख्या करता येईल. डॉ. आंबेडकरांनी येथील संस्कृतीकडे मूल्याधिष्ठित संस्कृती म्हणून पाहिले. भारतात सामाजिक व आर्थिक वर्चस्वाद हातात हात घालून चालतो. 1990 ला अनेक राम जन्मभूमी, जागतिकीकरण यासांरख्या ऐतिहासिक घटना भारतात घडल्या. धर्मनिरपेक्ष सर्वसामान्य माणसाचे स्वातंत्र्य अबाधित होते. स्वातंत्र्य, समता ,बंधुता ही भारताची मूलभूत मूल्य व्यवस्था आहे. ही मूल्य व्यवस्था कायम या ठिकाणी नांदली पाहिजे. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उप- प्राचार्य डॉ. एस. आर. मंझा, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. पंडित नलावडे, डॉ. राजू वनारसे, प्रा. दिगंबर गंगावणे, डॉ. स्वाती नरवडे यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा जिवरग मॅडम यांनी केले. तर आभार डॉ. रिजवान खान यांनी मानले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात “भारतीय लोकशाहीवरील वाढती आक्रमणे आणि प्रसारमाध्यमांची भूमिका” या विषयावर मंगल खिंवसरा म्हणाल्या की, अलिकडिल काळात प्रसार माध्यमांची भूमिका बदलत चालली आहे .प्रसारमाध्यमांनी विचारांची पारदर्शकता जपली पाहिजे.जेनेकरून स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही. प्राचीन भारतीय लोकशाही चा वसा आपण जपला पाहिजे. या सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना स. सो . खंडाळकर असे म्हणाले की, भारतीय संविधान हा विषय शाळेपासूनच शिकवला गेला पाहिजे. आपल्या संविधानाने आपणास स्वातंत्र्य ,बंधुत्व , समता आणि न्याय ही तत्व दिले आहेत. त्याची जपणुक आपण केली पाहिजे दुसऱ्या सत्रात “स्वातंत्र्योत्तर भारतातील पक्षीय, प्रादेशिक, राष्ट्रीय राजकारण आणि निवडणुकी समोरील आव्हाने” या विषयावर डॉ सुनिल पिंपळे असे म्हणाले की, अनेक प्रादेशिक पक्ष निर्माण होत आहे. आणि या प्रादेशिक पक्षाची भूमिका जाती धर्मात अडकलेली दिसून येत आहे असे ते म्हटले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ .रामकृष्ण लोमटे असे म्हणाले की, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आणि ही लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते. असे विचार त्यांनी मांडले. या कार्यशाळेत संशोधक विद्यार्थी, मार्गदर्शक प्राधापक व विद्यार्थी उपस्थित होते.