माणुसकी धर्म हा ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणून शिवरायांनी महाराष्ट्राला दिला – डॉ प्रकाश पवार
देवगिरी महाविद्यालयाच्या फुले-शाहू-आबेंडकर व्याख्यानमालेत प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करीत असताना तत्कालीन धर्म,वर्ण, जात व्यवस्था संपून पर्यायी व्यवस्था त्यांनी निर्माण केली. माणसांच्या अस्तित्वाची पूजा करत त्यांनी समतेच्या तत्वावर आधारलेले स्वराज्य निर्माण केले. यात स्त्री-पुरुष समतेसह अहिंसा या तत्त्वाला महत्त्वाचे स्थान होते. हिंसक स्वरूपाच्या लढाईपेक्षा वेळप्रसंगी तह-चर्चा-वाटाघाटी या स्वरूपाचे निर्णय घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अहिंसेचे तत्व जोपासले होते. यातूनच त्यांनी ‘माणुसकी धर्म’ पाळला असे प्रतिपादन डॉ.प्रकाश पवार यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय येथे फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला २०२४ वर्ष 33 वे या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. प्रकाश पवार यांनी गुंफले. ‘छत्रपती शिवाजी महाराज : परिवर्तनाचे कार्य आणि अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. या दुसऱ्या पुष्पाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद हे होते.
पुढे बोलताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले की, वर्तमान काळात शिवाजी महाराज नाटक- चित्रपटातून त्यांच्यावर लिहिलेल्या साहित्यातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे ‘सकल जनवादी’ स्वराज्याची स्थापना करू पाहत होते. यात ते माणसातला माणूसपण जोपासून माणुसकीचा धर्म जोपासत माणूसपणाचे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनी जुनी क्षत्रियत्वाची व्याख्या बदलून वर्णव्यवस्था मोडीत काढली सर्वांना समान संधी निर्माण केली. समन्यायी भूमिका व समता हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तत्व होते स्त्री-पुरुष समानता ही प्रत्यक्ष कृतीत आणणारे राजे म्हणजे शिवराय त्यामुळे आपल्याला शिवरायांचा सांस्कृतिक इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. शिवरायांचे धोरण समावेशनाचे होते. सकल जनांचा विचार व समावेशन व रयतेचे कल्याण ही शिवरायांच्या स्वराज्यांची त्रिसूत्री होती. शिवरायांच्या सकल जनवादामधून स्वराज्याची निर्मिती झाली. शिवरायांनी स्वराज्याच्या क्रांतीमध्ये केवळ हिंसेचा उपयोग विवेकाने केला, अस्तित्वाच्या लढाईमध्ये हिंसा ही शिवरायांच्या स्वराज्यामध्ये विवेकाने आली. महाराष्ट्रातील सकलजनांमधून शिवरायाने नेतृत्व घडवले. माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये विवेकवादी विचार करावा लागतो ही दृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. शिवरायाने वर्णव्यवस्थेतील क्षत्रित्वाची कल्पना संकल्पना मोडीत काढली आणि बहुजनांना नेतृत्वातील संधी दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय शेख सलीम शेख अहमद यांनी व्यक्त केले.व्याख्यानमालेसाठी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ सदस्य त्रिंबक पाथ्रीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर व्याख्यानमालीचे समन्वयक डॉ. गणेश मोहिते,उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.विजय नलावडे, प्रा.सुरेश लिपाने, प्रा. नंदकुमार गायकवाड व महाविद्यालयातील प्राध्यापक, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, साहित्यिक, विचारवंत व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार समन्वयक डॉ. सुलक्षणा जाधव यांनी केले.