कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय, अयोध्या यांच्यामध्ये सामंजस्य करार
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय, अयोध्या यांच्यामध्ये आज सोमवार, दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी आणि डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाचे कुलसचिव कर्नल डॉ. अंजनी कुमार मिश्रा यांनी सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले. या प्रसंगी प्रो. प्रसाद गोखले, संचालक, विद्यापीठ नियोजन विकास मंडळ, प्रो. कविता होले, अधिष्ठाता, संस्कृत तथा संस्कृतेतर संकाय, डॉ. हरेकृष्ण अगस्ती, संचालक, रामटेक परिसर, डॉ. अनिलकुमार दुबे, संचालक, मुक्त व दूरस्थ केंद्र, प्रा. कृणाल महाजन, डॉ. सुमित कठाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या करारान्वये कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे अभ्यासकम, अन्य शैक्षणिक कार्यकम आता उत्तर प्रदेशात पोचणार आहेत. याशिवाय दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आदान-प्रदान, कौशल्यविकास अभ्यासकम, हस्तलिखित प्रशिक्षण आणि संपादन, अनुवादकार्य, संयुक्त संशोधन प्रकल्प देखील राबविण्यात येणार आहे. या करारान्वये शिक्षण-प्रशिक्षण-विविध अभ्यासक्रम, तसेच प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ दोन्ही विद्यापीठांना मिळणार आहे. संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी सेमिनार, कार्यशाळा, परिषदांचे आयोजनही करण्यात येईल. विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र व उत्तरप्रदेश राज्य सरकार यांच्या अनुमतीने मुक्त व दूरस्थ शिक्षण केंद्राचे अध्ययन केंद्र सुरू करण्याचा मानसही आहे.
कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी या शैक्षणिक सामंजस्य करारान्वये महाराष्ट्र व उत्तरप्रदेश यांच्यात शैक्षणिक आदानप्रदान होणे शक्य होणार असून, याचा लाभ दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळेल. महाराष्ट्राबाहेर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे अभ्यासकम राबविले तर जातीलच परंतु विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळेल ही जमेची बाब आहे. या सामंजस्य करारात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाचे आभार मानले.