महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या स्पर्धकांना गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे विशेष सहकार्य
गडचिरोली : राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनाचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचे अनावरण दिनांक १५ जुलै, २०२३ रोजी मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रायसेफ नवसंशोधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाचे प्रचार व प्रसिध्दी उत्तम झाली व सदर उपक्रमास भरगोस प्रतिसाद मिळाला. राज्यातील शासकीय व खाजगी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली असलेल्या शैक्षणिक संस्था असे एकुण २१७२ संस्थांनी सहभाग घेतला ज्याअंतर्गत ९२२७ नवउद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली परिक्षेत्रातील चंद्रपूर जिल्हयातील ७९ महाविद्यालय व गडचिरोली जिल्हयातील ५७ महाविद्यालयांनी आपला यशस्वीरित्या सहभाग नोंदविला.
राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हास्तरावर सादरीकरण सत्र दिनांक २३ नोव्हेंबर, २०२३ ते २२ डिसेंबर, २०२३ दरम्यान घेण्यात आले असुन गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थ्यांचे सादरीकरण दिनांक ०४ डिसेंबर, २०२३ रोजी जिल्हा कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, गडचिरोलीच्या वतीने व ट्रायसेफ नवसंशोधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या सहकार्याने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या सभागृहात आयोजित करण्यात आले. सदर सादरीकरणात विद्यार्थ्यांच्या सहभागाने व त्यांच्या उत्तम प्रकल्पांनी शासनाचे लक्ष्य वेधून घेतले असुन गडचिरोली जिल्ह्यातील मोहित बोदेले, आर्या ठवरे, सचिन रोहनकर, संजना येलेकर, उमा सहारे, जयंत राऊत, दिक्षा वाळके, अनिकेत भुरसे, प्रतिक रामटेके व हिमाद्री गैन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विवेक अटलकर, अमियो दास, प्रिती पारवे व सुरज गौरकर हे विद्यार्थी विजेते ठरले असुन सदर विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत प्रत्येकी रु. एक लाख बिज भांडवल व ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे विशेष सहाय्य पुढील वाटचालीकरीता लाभणार आहे.
सदर उपक्रमात ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, संचालक, डॉ. अनिल चिताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धिरजसिंग चंदेल व व्यवस्थापक विनय साळवे,सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली योगेंद्र शेंडे आदींचे मार्गदर्शन लाभले तसेच या विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.