भारती विद्यापीठात “इंटरनॅशनल स्पोर्टस युनाईट २०२४ परिषद” संपन्न
कामगिरी सुधारण्यासाठी खेळाडूंचा सर्वांगीण विकास महत्वाचा – ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे
पुणे : एखादा खेळाडू यशस्वी होतो तो फक्त त्याच्या खेळामुळेच नाही तर त्याच्यात असलेल्या सर्वांगीण गुणांमुळे. त्यामुळेच कामगिरी सुधारण्यासाठी खेळाडूंचा सर्वांगीण विकास महत्वाचा असतो असे मत ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठ स्कुल ऑफ फिजिओथेरपी व्दारा आयोजित इंटरनॅशनल स्पोर्टस युनाईट २०२४ या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही परिषद भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल धनकवडी येथे नुकतीच पार पडली. स्पोर्ट्स फिजिओथेरपी, खेळाडूंचा आहार, खेळातील दंत विज्ञान, प्रशिक्षण, खेळाडूंची मानसिकता, इ. विविध विषयांवर तज्ञाची व्याख्याने झाली तर देश विदेशातील सुमारे ४०० मान्यवरांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी नॉर्थ इस्ट युनायटेड फुटबॉल क्लबचे कार्यकारी अध्यक्ष मंदार ताम्हाणे, भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप मेडिकल कॉलेजचे प्राचार्य मंदार करमरकर, फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्वाती भिसे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. स्नेहा काटके उपस्थित होते.
कुंटे पुढे म्हणाले, खेळाडूच्या शारीरिक क्षमतेबरोबर त्याचा मानसिक विकास, खाण्याच्या सवयी यांचा खूप प्रभाव पडतो. अशा परिषदांमुळे या विषयातील तज्ञ एकत्र येऊन चर्चा घडत आहे यामुळे खेळाच्या विकासाला निश्चितच हातभार लागेल. डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या खेळामुळे माणसाला आनंद मिळतो, त्यामुळे आपल्या आयुष्यात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. डॉ. सावजी म्हणाले गेल्या काही वर्षात क्रीडाक्षेत्रात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या परिषदेच्या मुख्य आयोजक डॉ. स्वाती भिसे होत्या तर डॉ. अनुश्री नारकुली व डॉ. रचना दाभडगाव यांनी आयोजक समितीचे काम पाहिले. डॉ. रुचिता किल्लेदार व डॉ. अपूर्वा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.