एमजीएम विद्यापीठात अभिरुप युवा संसद यशस्वीपणे संपन्न

खासदार होण्यासाठी जनतेची मने जिंकणे आवश्यक – माजी आमदार श्रीकांत जोशी 

छत्रपती संभाजीनगर : छोटी स्वप्ने पाहणे गुन्हा असून कोणीही खासदार होऊ शकते. खासदार होण्यासाठी पैसे, खूप मोठी ताकद असे काहीही लागत नसून जनतेची मने जिंकणारा व्यक्ती खासदार होतो, असे प्रतिपादन माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी यावेळी केले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिरुप युवा संसद’ स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी, मा.आ. श्रीकांत जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे, ज्येष्ठ संपादक प्रविण बर्दापुरकर, परीक्षक रूपेश कलंत्री, युवक बिरादरीचे सचिन वाकुळकर, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्रा. डॉ. आशा देशपांडे व सर्व संबंधित उपस्थित होते.

मा. आ. जोशी पुढे बोलताना म्हणाले की, संसदेच्या कामकाजाचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असून संसदेच्या विविध आयुधांचा आपण आज वापर करणार आहात. भारतीय लोकशाही समृद्ध करण्याची जबाबदारी तरुणाईची असून आपली अभिव्यक्ती संसदेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या चुकीच्या गोष्टी समाजमाध्यमाच्या मदतीने आपण मांडायला हव्यात. आज सर्वजण विभागीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी जरी होत असले तरी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचे नाव करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या!

 ‘अभिरुप युवा संसद’ स्पर्धा एमजीएम गेल्या काही वर्षांपासून घेत असून सातत्यपूर्ण या स्पर्धेत प्रथम क्रमांक येथील विद्यार्थी मिळवीत आले आहेत. तरूणांकडून आम्हां सर्वांना खूप अपेक्षा असून आपण त्या अपेक्षांना खरे उतराल, हा विश्वास विश्वास शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे यांनी यावेळी व्यक्त केला. ज्येष्ठ संपादक प्रविण बर्दापुरकर म्हणाले, आपली लोकशाही ही नुसती संसद नसून ती संसदीय लोकशाही आहे. आपला आपल्या संसदेवर आणि संविधानावर अढळ अशी निष्ठा असायला पाहिजे. समकालीन काळामध्ये आपण जे राजकारणी निवडून देतो ते लोक कसे आहेत, हे आपण चांगलेच जाणतो. सध्याची राजकीय समीकरणे खूप वेगळ्या प्रकारची असून सध्याच्या लोकशाहीबद्दल चिंताजनक स्थिती आहे.

Advertisement
Abhirup Youth Parliament successfully concluded at MGM University

एमजीएम विद्यापीठ या स्पर्धेचे आयोजक म्हणून गेल्या ४ वर्षापासून काम करीत आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत व्यक्त होत असताना आपल्या स्वतःच्या शैलीमध्ये व्यक्त होणे आवश्यक असल्याचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांनी सांगितले. या स्पर्धेत एकूण पाच संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. सहभागी संघांनी दिवसभर आपले सादरीकरण केले. विजेत्या संघांना रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

विजेत्या संघांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

प्रथम विजेता : एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (प्रमाणपत्र व १२५०० रुपये)

द्वितीय विजेता : मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, छत्रपती संभाजीनगर (प्रमाणपत्र व ७५०० रुपये)

उत्तेजनार्थ : दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर (प्रमाणपत्र व ५००० रुपये)

उत्तेजनार्थ : महात्मा गांधी विद्यामंदिर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मनमाड (प्रमाणपत्र व ५००० रूपये)

उत्तेजनार्थ : प्रताप कॉलेज, अमळनेर (स्वायत्त) (प्रमाणपत्र व ५००० रुपये)

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त स्पर्धकांची नावे :

१.      संयम देशमाने, एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (प्रमाणपत्र व २५०० रुपये)

२.      मेघराज शेवाळे, दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर (प्रमाणपत्र व २५०० रुपये)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक बिरादरीचे सचिन वाकुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्सा खान व आदिती हरदास यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आशा देशपांडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page