श्री बंकटस्वामी महाविद्यालयात “भारतीय संविधानाची ओळख” या विषयावर व्याख्यान
भारतीय संविधान जगातील सर्वोच्च लोकशाहीचा आत्मा – डॉ. आर. के. काळे
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “भारतीय संविधानाची ओळख” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून येथील श्री बलभीम महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. के. काळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे तसेच उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ काळे यांनी आपल्या मार्गदर्शन करताना म्हणाले की जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपल्या देशाची आहे. या संविधानामुळे लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम हे राज्यघटनेमुळे करता आले, संसदीय शासनपद्धती निर्माण केली आणि प्रत्येक व्यक्तीला मूलभूत हक्क दिले, मतदानाचा अधिकार देखील संविधानामुळे प्राप्त झालेला आहे. आज पाहत आहोत भारतामध्ये पूर्वी राजेशाही पद्धत होती त्यानंतर इंग्रज राजवट आली हुकूमशाही निर्माण झाली.
अशा वेगवेगळ्या स्थित्यंतरामधून या देशातील जनतेने गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करून लोकशाही राज्य निर्माण केले. एक स्वतंत्र संविधान ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मिळाले. सामाजिक न्याय व समता, बंधुता हे आपल्या संविधानाचे मुख्य वैशिष्ट्य आहेत म्हणून आजच्या तरुणांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करावा. संविधानाने दिलेल्या अधिकाराविषयी सर्व स्तरातील जनतेपर्यंत त्याच्या अधिकार काय आहेत याविषयी प्रबोधन करणे तसेच संविधानाने दिलेल्या हक्काविषयी जनजागृती करावी तसेच आपल्या ग्रामपंचायत, ग्रामपालिका सारख्या ठिकाणी जाऊन संविधानाने दिलेले अधिकाराविषयी जनजागृती व संविधानाबद्दल सर्व माहिती युवकांनी देण्याचे काम करावे असे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे युवराज महाडिक यांनी केले तर प्रास्ताविक कनिष्ठ विभागाचे प्रा. रमेश वळवी यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. दीपमाला माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते.