शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची कारभारवाडीला भेट
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच कारभारवाडी (ता. करवीर) या गावाला भेट देऊन विकासकामांची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी शेती आणि शेतीपूरक उद्योगासंदर्भात संवाद साधला. कारभारवाडीतील कै. शिवा रामा पाटील स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून केलेल्या पाणीपुरवठा योजनेची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. या योजनेतून शंभर एकर शेतजमीन ठिबक सिंचनाद्वारे संगणकीय पद्धतीने ओलीताखाली आणली आहे. या योजनेमुळे पाण्याची बचत होऊन एकरी उत्पादनक्षमता वाढली असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.
शेतीसाठी आवश्यक असणार्या गांडूळ खताच्या प्रकल्पाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. गांडूळ खताचे एकूण 34 बेड असून यााचाही शेतीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सुमारे एक एकर परिसरात शेतकर्यांनी एकत्र येऊन सामुदायिक पद्धतीने केलेल्या जरबेरा फूल शेतीलाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. दहा ते बारा शेतकर्यांनी एकत्र येऊन हा प्रयोग केला असून जरेबराची फुले मुंबई तसेच हैद्राबाद येथील बाजारपेठेत पाठविली जातात, अशी माहिती या प्रकल्पाचे संकल्पक डॉ. नेताजी पाटील यांनी दिली. कारभारवाडीत गुळ निर्मितीचा अत्याधुनिक प्रकल्प सुरू असून या प्रकल्पालाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. याठिकाणी केमिकल विरहित गुळाचे उत्पादन घेतले जाते. स्थानिक शेतकर्यांकडून ऊस खरेदी करून गाळप केले जाते. यातून कारभारी गोडवा नावाचा एक ब्रॅन्ड शेतकर्यांनी विकसित केला आहे. या गुळाला जागतिक बाजारपेठेत मागणी असून बहुतेक गूळ कॅनडाला निर्यात केला जातो, अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी दिली. पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांच्या मार्गदर्शनाने तसेच डॉ. शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यासदौरा आयोजित केला होता.
फोटो ः