उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवक महोत्सवात ललित कला प्रकारात उपविजेते पद
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवक महोत्सवात ललित कला विभागात उपविजेते पद प्राप्त झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे नुकताच पश्चिम विभागीय युवक महोत्सव झाला. या महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ सहभागी झाला होता. ललित कला विभागात विद्यापीठाच्या संघाला उपविजेते पद प्राप्त झाले त्यामध्ये क्ले मॉडेलिंगमध्ये देवा सपकाळे या विद्यार्थ्याला सुवर्णपदक प्राप्त झाले तर इन्स्टॉलेशन कला प्रकारात रौप्य पदक प्राप्त झाले. या कला प्रकारात देवा सपकाळे, माधुरी बडगुजर, तौसिफ शेख, समय चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. याशिवाय स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत समय चौधरी या विद्यार्थ्याला कास्य पदक प्राप्त झाले. हे सर्व विद्यार्थी मुळजी जेठा महाविद्यालयाचे आहेत. या संघासोबत डॉ. जुगलकिशोर दुबे व डॉ. सुनीता कावळे हे संघ व्यवस्थापक म्हणून गेले होते.
विद्यापीठाला प्रथमच पश्चिम विभागीय युवक महोत्सवातील कला प्रकारात उपविजेते पद प्राप्त झाले आहे. या विजयी संघाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. शिवाजी पाटील, ॲड अमोल पाटील, नितिन झाल्टे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी अभिनंदन केले.