देवगिरी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाच्या परिपत्रकानुसार देवगिरी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनानुसार वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, उस्फुर्त व्यक्त व्हा, संत विचार प्रमाणपत्र परीक्षा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून आपला दैनंदिन व्यवहार हा अधिकतम मातृभाषेतून करणे गरजेचे आहे, त्यामुळे आपल्या मातृभाषेचे संवर्धन होईल. तसेच मातृभाषेतून केलेल्या संवादामुळे आपला आत्मविश्वास हा सातत्याने वाढत जातो असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची सांगता ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. महाविद्यालय व महाविद्यालयाच्या परिसरातून विविध पारंपारिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. ज्ञानोबा तुकाराम या गजराने देवगिरी महाविद्यालयाचा परिसर दुमदुमला होता. समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध समीक्षक डॉ. दत्ता घोलप उपस्थित होते त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करत वर्तमान काळातील तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी ही युवकांची असून ती युवकांनी समर्थपणे पेलले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच विविध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हा भाषिक पंधरवडा यशस्वी करण्यामध्ये मराठी विभाग प्रमुख डॉ.समिता जाधव, डॉ.गणेश मोहिते, डॉ.गणेश राठोड, डॉ.विना माळी, डॉ.सचिन मुंडे, डॉ.मथुरा मेवाड, डॉ.समाधान खलसे, डॉ.संग्राम शिंदे, प्रा.गणराज मस्के आदींनी परिश्रम घेतले या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा च्या विविध स्पर्धेमध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला