उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून संशोधन प्रोत्साहन योजनेस यश
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रशाळांमधील संशोधन वाढीला लागावे यासाठी समाजातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींना फेलोशिपकरीता प्रायोजक म्हणून मदतीच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जळगावच्या सुहान्स केमिकल्स प्रा. लि. ने सीएसआर फंड अंतर्गत तीन फेलोशिप प्रायोजित करण्यासाठी ८ लाख ५० हजार रुपये विद्यापीठाला दिले आहेत.
संशोधनासाठी शासनाच्या विविध वित्तीय संस्थांकडून निधी प्राप्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून संशोधन प्रोत्साहन योजना (प्रमोट) आकाराला आली आहे. या योजनेत समाजातील दानशूर व्यक्ती अथवा सेवाभावी संस्था यांना फेलोशिपचे प्रायोजकत्व घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. जळगाव येथील सुहान्स केमिकल्स प्रा. लि. चे संचालक संदीप काबरा, तसेच सतना काबरा यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत रसायनशास्त्र विषयातील संशोधनासाठी डॉ. किशन काबरा फेलोशिप २ विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे तर पर्यावरणशास्त्र विषयातील संशोधनासाठी १ फेलोशिप सुरु केली आहे. या एकुण तीन फेलोशिपसाठ ८ लाख ५० हजार रुपयांचा निधी कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या कंपनीच्या सीएसआर फंडातून हा निधी देण्यात आला आहे. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील तसेच डॉ. भूषण चौधरी, डॉ. राजेश जवळेकर, डॉ. विकास गिते उपस्थित होते.